मुंबई : मागाठाणे विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्न लवकर मार्गी लागणार आहेत. कारण या भागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिका उपायुक्त विश्वास शंकरावर यांच्या दालनात आर/उत्तरचे सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, आर/मध्यचे सहायक आयुक्त रमाकांत विराजदार आणि आर/दक्षिणचे सहायक आयुक्त संजय कुराडे यांची संयुक्त बैठक आयोजित करून, येथील विविध समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेणात आले, अशी माहिती येथील शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.बैठकीत दहिसर पूर्व गणुबुवा कंपाउंड, केतकीपाडा येथील हनुमाननगर रोडमध्ये बाधित झोपडीधारकांचे नाव परिशिष्ठामध्ये आले असून, या झोपडीधारकांना प्रकल्प बाधित व्यक्ती (पीएपी) अंतर्गत लवकरच घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. बोरीवली (पूर्व) शनी मंदिर, चोगलेनगर ते नॅन्सी वसाहतमधील रस्ता आर/उत्तर आणि आर/मध्य यांच्या अंतर्गत येत असून, सदर रस्ता विकासापासून वंचित होता. बैठकीत विकासात अडथळा येणारी रस्त्यामधील ३ घरे काढून त्यांना प्रकल्प बाधित व्यक्ती (पी ए.पी) अंतर्गत लवकरच घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर रस्ता विकसित करण्याचे आदेश देण्यात आले. बोरीवली पूर्व मित्रत्व सहकारी गृहनिर्माण निर्माण संस्था, देवीपाडा, बोरीवली येथील कित्येक महिने पडलेले डेब्रिज उचलण्याचे आदेश उपायुक्त विश्वास शंकरराव यांनी आर/मध्यचे सहा आयुक्त रमाकांत विराजदार यांना दिले.
दहिसर (पूर्व) शिवाई संकुल इमारत, शिव वल्लभ क्रॉस रोड, अशोकवन येथील रुग्णालय ८ ते १० दिवसांमध्ये महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांसाठी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. कांदिवली पूर्व लक्ष्मीनगर, दामूनगर येथील शेवटचे बसस्थानक येथील मुख्य नाला स्थानिक विकासकाने स्वहितासाठी बुजवून, त्याचे रूपांतर लहान नाल्यात केल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते. बैठकीत उपायुक्त विश्वास शंकरराव यांनी आर/दक्षिणचे सहायक आयुक्त संजय कुराडे यांना सदर ठिकाणी पाहणी करून, विकासकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊन मुख्य नाला पुनर्स्थितीत आणण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती आमदार सुर्वे यांनी दिली.