Join us

विविध नेत्यांनी संघटना काढून आपल्या राजकीय भविष्याचा पाया रचला- प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 8:23 PM

संभाजीराजे यांच्या या भूमिकेवरुन भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून छत्रपती संभाजीराजे यांच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीची मुदत संपल्यानंतर त्यांनी आज आपल्या पुढील प्रवासाची दिशा ठरवली आहे. राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असून स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली. 

समाजाला दिशा देण्यासाठी आणि समजाच्या हितासाठीच मी आजवर भूमिका घेत आलो आहे. सहा वर्षात मी कुठेही राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा धुळीस मिळेल असं वागलेलो नाही. जनसेवा करायची असेल तर राजसत्ता देखील महत्वाची आहे. त्यामुळे जुलैमध्ये राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होत आहेत. यात मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, अशी घोषणा संभाजीराजे यांनी यावेळी केली. त्यांनी यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन देखील केलं आहे. 

संभाजीराजे यांच्या या भूमिकेवरुन भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कोणालाही कुठलीही संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'स्वाभिमान' व आमदार गणेश नाईक यांनी 'शिवशक्ती' संघटना स्थापन केली. अनेक नेत्यांनी अशा संघटना काढून आपल्या राजकीय भविष्याचा पाया रचला, असं प्रवीण दरेकर म्हणाले. 

संभाजीराजे यांना अशाप्रकारच्या भूमिकेतून भविष्यात पक्ष काढायचा असेल व स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राजकीय पाया रचण्याची त्यांची भूमिका असू शकते, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्राच्या जनतेनं छत्रपती घराण्याला आजवर खूप प्रेम केलं. सत्तेत राहून मी अनेक कामं करू शकलो. समाजहित ज्यात असेल त्याची बाजू मी घेत आलो आहे. महाविकास आघाडी असो किंवा भाजपा असो. ज्यावेळी समाजहित मला जिथं दिसलं तिथं मी बाजू मांडत आलो आहे. त्यामुळे माझं सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन आहे की त्यांनी मला पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यासाठी सहकार्य करावं", असं संभाजीराजे म्हणाले. 

आजपासून मी कुठल्याही पक्षाचा नाही- संभाजीराजे

"मला विश्वास आहे की छत्रपतींच्या घराण्यातील एकमेव माणूस म्हणून मी समाजहितासाठी कामं करतोय. मी आजपासून कुठल्याही पक्षात नाही. मी अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार आहे. मी कुठल्याही पक्षात जात नाहीय", असं संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केलं. 

टॅग्स :प्रवीण दरेकरसंभाजी राजे छत्रपती