विनाश टाळण्यासाठी पर्यावरणावर वेगवेगळे प्रकल्प राबवावेत - माधव गाडगीळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 02:21 AM2020-10-17T02:21:04+5:302020-10-17T02:21:37+5:30
व्होकल फॉर लोकल ट्रीज’ वेबिनारमध्ये आवाहन; लोकमत आणि सपट आयुसासचे संयुक्त आयोजन
मुंबई : स्वातंत्र्य मिळाल्यापासून वृक्षारोपणाची मोहीम राबविली जाते. परंतु झाडे लावल्यानंतर ती जगत नाहीत. रस्त्यालगतची झाडे तुटत आहेत. पर्यावरणाचा विनाश टाळायचा असेल तर शिक्षण म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये गुण मिळविण्याचा एकच मार्ग आहे, हे डोक्यातून काढून पर्यावरणावर वेगवेगळे प्रकल्प राबविले गेले पाहिजेत, असे कळकळीचे आवाहन पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी केले. ‘लोकमत’ आणि सपट आयुसासच्या संयुक्त उपक्रमांतर्गत आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. राज्यभरातील वाचक या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.
माधव गाडगीळ म्हणाले, वड, पिंपळ आणि उंबर यांच्या प्रजातींसह आंबा या झाडाच्या गोतावळ्याचा विचार केल्यास असे लक्षात येते की, या फळांवर अनेक पक्षी आपले आयुष्य जगतात. भारतासह अनेक देशांत वडाला पवित्र वनस्पती मानले जाते. या झाडांच्या प्रजाती अॅमेझॉन जंगलात आहेत. ही झाडे जपली तर बाकीचे पशू-पक्षी जगतात. मात्र, आजही ही झाडे नष्ट होत आहेत. वडासारखी अचूक झाडे लावा आणि जैवविविधतेचा समतोल राखा.
पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर म्हणाले की, सध्या पर्यावरणाची अधिकाधिक हानी होऊन नकळत जैवविविधता नष्ट होत आहे. सप्टेंबर हा फुलपाखरांचा महिना म्हणून ओळखला जातो. मात्र, आपल्याकडे फुलपाखरे, मधमाश्या नष्ट होत आहे. आपण असेच वागत राहिलो, तर पुढच्या पिढीला आॅक्सिजन मिळणार नाहीे. यासाठी आपण झाडे लावली पाहिजेत.
‘लोकमत पाठशाला’च्या संंचालिका रुचिरा दर्डा म्हणाल्या की, आपण अधिकाधिक पर्यावरणपूरक होऊन सौरऊर्जेचा वापर आणि पाण्याची बचत केली पाहिजे. आपल्या फायद्याऐवजी पर्यावरण संवर्धन केले पाहिजे. ‘द राईट ग्रीन’च्या संस्थापक आद्या जोशी यांनी प्रकल्प सादरीकरणाद्वारे पक्षी आणि झाडांचे महत्त्व विशद केले तसेच स्थानिक आणि विदेशी झाडे आणि त्यांच्या प्रजातींबद्दल माहिती दिली. ‘एशिया अर्थ डे’ नेटवर्कच्या संचालिका करुणा सिंग यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. अरवली बायोडाव्हर्सिटीचे निर्माता विजय धसमाना यांनी पर्वतांचे पर्यावरणातील महत्त्व विशद केले. ‘एन्व्हायन्मेंट इकॉलॉजी’चे लेखक डॉ. तुषार घोरपडे यांनी स्थानिक प्रजातींची झाडांचे महत्त्व सांगून वृक्षोरोपण करताना अशीच झाडे लावण्याचे आवाहन केले.
उपक्रमाचे कॅम्पस क्लब आणि लेट मी ब्रिथ पार्टनर्स आहेत.
स्थानिक झाडे लावा :
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर आणि तरुणांचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर यांनी एका संदेशातून अधिकाधिक स्थानिक झाडे लावण्याचे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये ‘आयुसास नेचर का सुपर हीरो’ मोहीम जाहीर केला.
हा कार्यक्रम पुन्हा पाहण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा bit.ly/Vocalforlocaltreeswebinar तसेच स्थानिक झाडे लावून ह्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी https://bit.ly/AyusasNatureKaSuperhero ही लिंक वापरा आणि पुरस्कार विजेते ट्री इ-गाईड आणि सुपरहिरो प्रमाणपत्र मिळवा.