लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच अचानक मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गायकवाड यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
जगताप यांच्याविरोधात दिल्लीत अनेक तक्रारी झाल्या होत्या. तसेच विधानपरिषद निवडणुकीत पक्षाने चंद्रकांत हंडोरे यांना मतांचा कोटा ठरवून देऊन विजयी करण्याचे निश्चित केले होते. मात्र जगताप यांनी स्वतःकडे मते खेचल्याने हंडोरेंचा पराभव झाला हाेता. त्यामुळे दलित समाज नाराज होता. वर्षा गायकवाड यांच्याकडे अध्यक्षपद देऊन ही नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न काँग्रेसने केला आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार अशी भाषा ते वारंवार करत होते. दुसरीकडे पक्षाची भूमिका ही महाविकास आघाडीबरोबर एकत्रित निवडणूक लढवण्याची होती.
काँग्रेसमध्ये आणखी दोन बदल
गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी शक्तीसिंह गोहिल यांची नियुक्ती केली आहे. तर पाँडेचरी प्रदेशाध्यक्षपदी व्ही. वैथिलिंगम यांची नियुक्ती केली आहे.
वडिलांनंतर मुलीलाही अध्यक्षपदाचा मान
- प्राध्यापक असलेल्या वर्षा गायकवाड मागील अनेक वर्ष मुंबई काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. २००४ पासून सलग चार वेळा त्या धारावी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
- २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याणमंत्री होत्या, तर महाविकास आघाडी सरकारमध्ये शिक्षणमंत्री हाेत्या. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनीही मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते.