मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे सुरु असलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांची शाळेची फी घेताना पालकांना सवलत द्यावी असे महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.
राज्य शासनाचे आदेश डावलून बोरिवली पश्चिम येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल सह अनेक शाळांनी फी वाढ केलेली आहे. तसेच काही शाळा फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावत आहेत. फी न भरल्यास ऑनलाईन वर्गात बसण्यास मुलांना येथील शाळा परवानगी देत नाहीत. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिवसेना व युवासेना सिनेट प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली.
शिष्टमंडऴात शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस, युवासेना मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रदिप सावंत, शशिकांत झोरे, शितल शेठ - देवरुखकर, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, व शाखाप्रमुख विपुल दारुवाले यांचा समावेश होता. सदर शाळांची चौकशी करुन दोषी आढळ्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी शिवसेना शिष्टमंडळास दिल्याची माहिती आमदार विलास पोतनीस यांनी दिली.
हजारो शालेय विद्यार्थ्यांना दिलासा
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आल्या,महाराष्ट्रातील मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव कालावधीत वास्तविक शाळांना सुट्टी देण्यात येते. परंतू दादर येथील सेंट पॉल हायस्कूलने सत्र परिक्षेचे वेळापत्रक उत्सव काळात जाहिर केल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदर तक्रारीची त्यांनी दखल घेतली.
आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली सिनेट सदस्य शशिकांत झोरे,प्रदीप सावंत, राजन_कोळंबेकर,शितल शेठ देवरुखकर,महादेव जगताप तसेच युवासेना विभाग अधिकारी शार्दुल म्हाडगुत व रितेश सावंत यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली त्याची दखल घेऊन त्यांनी त्वरीत कारवाईचे निर्देश दिल्याने अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.