लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई दक्षिण मध्य लोकसभेची जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी अखेर प्रचारासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. उद्धव सेनेचे अनिल देसाई यांना धारावीतून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचे चॅलेंज आपण स्वीकारल्याचे गायकवाड यांनी गुरुवारी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. उत्तर आणि उत्तर मध्य या दोन जागांमुळे काँग्रेस नाराज आहे, असे म्हटले जात असतानाच ही बैठक पार पडली. मुंबईतील सहाही जागा निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. शिवाजी पार्क येथील सावरकर स्मारक येथे गुरुवारी ही बैठक पार पडली. उद्धवसेना, काँग्रेस, शरद पवार गट, आम आदमी पार्टी, सीपीआय, समाजवादी पार्टी आणि आंबेडकरी पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला न मिळाल्याने गायकवाड नाराज आहेत, असे म्हटले जात असताना त्यांनी बैठकीला हजेरी लावून चर्चांना पूर्णविराम दिला.
काँग्रेसचे नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे हेही यावेळी उपस्थित होते. ही लढाई देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई आहे. भाजपला १५ लाख रुपये कुठे गेले, सिलिंडरचे दर कमी केले का, दोन कोटी नोकऱ्या कुठे गेल्या, मणिपूर आणि महिला अत्याचारावर प्रश्न विचारा, असेही आवाहन त्यांनी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले.
धारावीतील ७ लाख लोकांना बेघर केले जात आहे; पण त्यावर खासदार राहुल शेवाळे संसदेत बोलले नाहीत, असा आरोप उद्धवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी केला. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहेत. लोकांचे रोजगार जात आहेत, अशी टीका उमेदवार अनिल देसाई यांनी केली. मुंबईतून इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, डायमंड मार्केट गुजरातला नेले. आता मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचा भाजपाचा अजेंडा आहे, असा आरोप काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला.