Join us

'हे केवळ काँग्रेसमध्येच घडू शकते'; वर्षा गायकवाड भावूक, भाई जगताप यांचेही मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 11:22 PM

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

मुंबई: काँग्रेसने आपल्या मुंबईतील पक्षसंघटनेत मोठा फेरबदल केला आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते भाई जगताप यांची मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली असून, त्यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी या नियुक्तीची घोषणा केली आहे. काँग्रेसने मुंबई बरोबरच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नव्या प्रदेशाध्यक्षांची  नियुक्ती केली आहे.

वर्षा गायकवाड या काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड ह्या मुंबईतील धारावी मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. तसेच त्यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्याआधी आघाडी सरकारच्या काळात महिला आणि बालविकास मंत्री म्हणून काम पाहिले होते. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

दलित महिलेला मुंबईतील काँग्रेसच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी आज सोपवली गेली आहे, हे केवळ काँग्रेसमध्येच घडू शकते. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. तसेच आजचा हा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक असून मी कृतकृत्य झाले आहे. काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ राहून माझ्या वडिलांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत जनसेवेत स्वतःला झोकून दिले होते. आज तीच जबाबदारी सांभाळण्याची संधी मला देखील देण्यात आली आहे, यासाठी मी पक्षश्रेष्ठींची कायम ऋणी राहीन, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. 

सध्याच्या घडीला एकीकडे आपल्या लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांना पायदळी तुडवण्याचे अभद्र काम सुरु असताना दुसरीकडे काँग्रेस मात्र खोटेपणाचे विणलेले जाळे आणि द्वेषाचे चक्र मोडून काढण्यासाठी तसेच संविधान टिकवण्यासाठी सातत्याने झटत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने मुंबईसह देशभरात नवीन आशेची ज्योत पेटवली आहे. "हम सब एक हैं", या विचारधारेतुन प्रेरित माझ्या वडिलांनी राजकारणातून समाजकारणाचा मार्ग आयुष्यभर अवलंबला. एकता, सामाजिक विकास आणि सौहार्दाचे राजकारण नेहमीच द्वेषाहुन सरस ठरते, त्यावर विजय मिळवते, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. आणि यावर माझाही विश्वास असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. 

भाई जगताप यांचे मानले आभार-

मागील अडीच वर्षांत आमदार भाई जगताप यांनी मोठ्या ताकदीने आणि सक्षमपणे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले, याबद्दल त्यांचे अभिनंदन. भाईंना समर्थपणे साथ दिलेल्या मुंबईच्या काँग्रेस टीमचे देखील अभिनंदन करते आणि आभार मानते. त्यांची भक्कम साथ मलाही लाभेल असा विश्वास आहे, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :वर्षा गायकवाडकाँग्रेसअशोक जगताप