मुंबई - कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे या महिन्यात सुरु होणाऱ्या परीक्षांबाबतही काय निर्णय होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. त्यातच, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, याबाबतही सरकार विचार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील आमदारांशी संवाद साधला. त्यामध्ये, रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यानुसार, परीक्षा ऑफलाईनच घ्याव्यात, असे त्यांनी सूचवले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत निर्णय घेण्यापूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ मंडळी या सगळ्या घटकांशी चर्चा करत आहेत. त्यांनी आज आमदारांशी ऑनलाईन संवाद साधला असता रोहित पवार यांनी काही मुद्दे मांडले.
मुलांची शाळा हेच त्यांचं परीक्षा केंद्र असेल, त्यामुळं त्यांना दुसऱ्या केंद्रावर जावं लागणार नाही. दरम्यान, परिक्षेपूर्वी या प्रक्रियेतील सर्वांचं लसीकरण करावं व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही केंद्र सरकारशी चर्चा करावी. निकाल वेळेवर लावण्यासाठीही आतापासूनच नियोजन करण्याची गरज रोहित पवार यांनी व्यक्त केली.
आजच्या परिस्थितीत परीक्षा घेणं ही केवळ शिक्षण विभागाची जबाबदारी नाही तर त्यासाठी इतर सर्व विभाग, विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व घटकांना प्रयत्न करावे लागतील. याबाबत शिक्षणमंत्री योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.