Join us

सरसकट शाळा बंद करण्याचा विचार नाही: वर्षा गायकवाड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 5:39 AM

ओमायक्रॉनची भीती असली तरी राज्यातील शाळा सरसकट बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ओमायक्रॉनची भीती असली तरी राज्यातील शाळा सरसकट बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी स्पष्ट केले. एखाद्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळले तर काय करायचे, हे स्थानिक प्रशासन ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

घणसोली येथील १८ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर ही शाळा सील करण्यात आली. या घटनेनंतर राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्याच्या बातम्या झळकू लागल्या. या पार्श्वभूमीवर खुलासा करताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सरसकट शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. यासंदर्भातील बातम्या विपर्यस्त आहेत. एखाद्या ठिकाणी कोरोनाबाधित आढळल्यास काय करायचे, या संदर्भातील एसओपी आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. त्या आधारावर स्थानिक प्रशासनाने म्हणजेच आयुक्त, संबंधित शिक्षण अधिकारी आदींनी निर्णय घ्यायचा आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :वर्षा गायकवाडशाळा