Join us  

वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 5:27 PM

सर्वाधिक काँग्रेसचे आमदार लोकसभा सदस्यपदी निवडून गेले आहेत. यामुळे त्यांना खासदारकीची शपथ घेण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत आहे.

लोकसभेला विजयी झाल्याने काँग्रेसच्या आमदारांना विधानसभेचा राजीनामा द्यावा लागत आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. आज वर्षा गायकवाड यांनी राजीनामा दिला. आणखी एका महिला आमदाराचा राजीनामा येणे बाकी आहे. ऐन विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर आमदारांचे राजीनामे द्यावे लागल्याने काँग्रेसच्या संख्याबळात घट झाली आहे. 

शिवसेनेचे दोन आमदार खासदार झाले आहेत. त्यांचेही राजीनामे येणे बाकी आहे. सर्वाधिक काँग्रेसचे आमदार लोकसभा सदस्यपदी निवडून गेले आहेत. यामुळे त्यांना खासदारकीची शपथ घेण्यापूर्वी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. 

राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांनी शरद पवार गटातून उमेदवारी मिळताच राजीनामा दिला होता. परंतू, ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या रविंद्र वायकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता. तसेच संभाजीनगरहून खासदार झालेले संदिपान भुमरे देखील खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. चंद्रपूरच्या काँग्रेसच्या नवनियुक्त खासदार प्रतिभा धानोरकरही आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. 

येत्या चार महिन्यांवर विधानसभा निवडणूक आल्याने या रिक्त जागांवर आता पोटनिवडणूक होणार नाही. पोटनिवडणूक होण्यासाठी विधानसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी असावा लागतो. आता या हक्काच्या जागांवर काँग्रेस येत्या विधानसभेला कोणते उमेदवार देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :वर्षा गायकवाडकाँग्रेसशिवसेना