वर्षा राऊत ईडीच्या चौकशीला गैरहजर; ५ जानेवारीला हजर राहण्याचे नवे समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 01:11 AM2020-12-30T01:11:55+5:302020-12-30T06:56:42+5:30
खडसेंनीही मुदत मागितली
मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत पीएमसी बँकेतील ठेवीबाबत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात मंगळवारी चौकशीला गैरहजर राहिल्या. त्यांनी ५ जानेवारीला हजर राहण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली. ती ईडीने मान्य करून त्यांना ५ जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजाविल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, भोसरीतील कथित भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या बुधवारी ईडीकडून होणाऱ्या चौकशीला ते हजर राहाणार नाहीत. कोरोनासदृश्य लक्षणे जाणवत असल्याने सध्या हजर राहू शकत नसल्याचे त्यांनी कळवले आहे.
पीएमसी बँकेत वर्षा राऊत यांच्या खात्यात १२ वर्षांपूर्वी निकटवर्तीय प्रकाश राऊत यांच्याकडून ५० लाख रुपये भरण्यात आले होते. याबाबत प्रकाश राऊत व त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदविण्यात आला असून ईडी गेल्या दीड महिन्यापासून वर्षा राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार करून विचारणा करीत आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना २९ डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. मात्र संजय राऊत यांनी भाजपकडून ही राजकीय सुडातून कारवाई सुरू असल्याची टीका केली. मंगळवारी त्यांच्या पत्नी वर्षा या ईडीच्या कार्यालयाकडे गेल्या नाहीत.
खडसेंची प्रकृती बिघडली
खडसे यांची प्रकृती ठीक नाही. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती पूर्ववत झाल्यानंतर ते चौकशीला हजर राहतील, असे त्यांच्या वकिलांनी ईडी कायार्लयाला कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.