लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पीएमसी बँकेतील ठेवीमुळे चर्चेत आलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची मंगळवारी सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात चौकशी होणार आहे. त्यांच्या विनंतीनुसार ही तारीख निश्चित करण्यात आल्याने त्यांना यावेळी चौकशीला हजर राहणे अपरिहार्य असल्याचे सांगण्यात आले.
राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याविरुद्ध पीएमसी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या शुक्रवारी त्यांची ७२ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. वर्षा राऊत यांची त्यांच्या चार कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचा ईडीचा संशय आहे.
प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाऊंटवर बारा वर्षांपूर्वी ५० लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू आहे. २९ डिसेंबरला त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजविले होते. मात्र त्यांनी त्यासाठी ५ जानेवारीपर्यंत मुदत घेतली. त्यानुसार वर्षा राऊत या मंगळवारी ईडीच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता हजर राहतील. यावेळी त्यांची अवनी कन्ट्रक्शनमध्ये आणि त्याच्याशी संलग्न रॉयटर्स एंटरटेन्मेंट, एलएलपी व सनातन मोटर्स या अन्य तीन कंपन्यांमध्ये त्यांची भागीदारी असल्याबद्दल सविस्तर विचारणा केली जाईल, असे सांगण्यात आले.