वर्षा राऊतांची १० तास चौकशी; पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून प्रश्नांची सरबत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 06:10 AM2022-08-07T06:10:20+5:302022-08-07T06:29:15+5:30
वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची शनिवारी ईडी कार्यालयात समोरासमोर चौकशी झाल्याचे समजते.
मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची शनिवारी ईडीने दहा तास चौकशी केली. या व्यवहारातील लाखो रुपये हे वर्षा राऊत यांच्या खात्यात आले होते, असा दावा ईडीने केला असून, त्याच प्रकरणी वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची शनिवारी ईडी कार्यालयात समोरासमोर चौकशी झाल्याचे समजते.
उपलब्ध माहितीनुसार, वर्षा राऊत यांच्या नावावर असलेला दादर येथील फ्लॅट आणि अलिबागमधील किहिम येथील ८ भूखंड यांची खरेदी प्रवीण राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात मिळालेल्या पैशातून झाली असून, हे पैसे वर्षा राऊत यांच्या खात्यामध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून आले होते. ही रक्कम ५५ लाख रुपये इतकी होती. मात्र, कौटुंबिक मैत्रीतून हे कर्ज आपल्याला मिळाले होते आणि ते परतही केल्याचे वर्षा राऊत यांनी यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, मुळात हे पैसेच पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या गैरव्यवहारांतील असल्याने ते पैसे गुन्ह्याचा भाग आहेत, त्यामुळेच ही चौकशी करणे गरजेचे असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि किहीम येथील भूखंड अशी ११ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने एप्रिलमध्ये जप्त केली आहे. सूत्रांच्या मते, वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून १ कोटी ६ लाख रुपये आले होते. त्याचाही अधिक तपास आता सुरू होत आहे. पत्राचाळीशी संबंधित विविध आर्थिक व्यवहारांचा ईडीचे अधिकारी तपास करत आहेत. यातील अनेक बँक खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात पैसे आल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या दुसऱ्या रिमांड अर्जात केला होता. त्यामुळे, ज्या बँक खात्यातून वर्षा राऊत यांच्या बँक खात्यामध्ये पैसा आला, त्या खात्यांच्या केवायसी आणि बँक स्टेटमेंटचा तपासही ईडीचे अधिकारी करत असल्याचे समजते. दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजता वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल झाल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी, जावईदेखील ईडी कार्यालयापर्यंत त्यांच्यासोबत आले होते.
राऊतांकडून उडवाउडवीची उत्तरे
किहिम येथील ८ भूखंडांची खरेदी संजय राऊत यांनी रोख पैसे देऊन केल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. मात्र, या भूखंड खरेदीची कोणतीही माहिती संजय राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांना देत नाहीत. राऊत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे आता राऊत यांनी या भूखंडांच्या मूळ मालकांना ईडीच्या मुंबईतील कार्यालयांत बोलावून त्यांचे जबाब नोंदविल्याचे समजते. यापैकी काही भूखंड हे वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या संयुक्त नावावर आहेत तर काही भूखंडांची मालकी वर्षा राऊत यांचीच असल्याची माहिती आहे.