ठाकूर महाविद्यालयाला कारणे दाखवा, तीन दिवसात खुलासा करण्याचे विद्यापीठाचे आदेश

By रेश्मा शिवडेकर | Published: March 26, 2024 06:43 PM2024-03-26T18:43:35+5:302024-03-26T18:45:15+5:30

ठाकूर कॉलेजमध्ये झालेल्या प्रकाराच्या निमित्ताने या कार्यक्रमाचा उपयोग राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती वा नेत्यांना प्रचारासाठी करून देण्यात येऊ नये, याची काळजी घेण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केली आहे.

varsity orders disclosure within three days to Thakur College mumbai | ठाकूर महाविद्यालयाला कारणे दाखवा, तीन दिवसात खुलासा करण्याचे विद्यापीठाचे आदेश

ठाकूर महाविद्यालयाला कारणे दाखवा, तीन दिवसात खुलासा करण्याचे विद्यापीठाचे आदेश

मुंबई - कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे उत्तर मुंबईतील लोकसभा उमेदवार पियुष गोयल यांचे चिरंजीव ध्रुव गोयल यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांना बळजबरीने बसविण्याच्या प्रकाराबाबत मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच, महाविद्यालयांमध्ये नवीन मतदान नोंदणी व नवमतदारांमध्ये जाणीवजागृती करण्यात येत आहे. ठाकूर कॉलेजमध्ये झालेल्या प्रकाराच्या निमित्ताने या कार्यक्रमाचा उपयोग राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती वा नेत्यांना प्रचारासाठी करून देण्यात येऊ नये, याची काळजी घेण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केली आहे.
 
२३ मार्च रोजी ध्रुव गोयल यांच्या भाषणाला सक्तीने बसविण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर शिवसेनाप्रणित (उबाठा) युवा सेनेच्या नेत्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुळकर्णी यांची भेट घेत ठाकुर कॉलेजवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयाला पत्र पाठवून झालेल्या प्रकाराबाबत तीन दिवसांच्या आत खुलासा करण्यास सांगितले आहे.
 
विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना त्यांना वेठीस धरून निवडणुक प्रचारासाठी बळजबरीने महाविद्यालयाच्या सभागृहात बसवून ठेवण्यात आले. भाजपा उमेदवार पीयुष गोयल यांचा चिरंजीव ध्रुव यांनी महाविद्यालय प्रशासनाला हाताशी धरुन प्रचार केल्याचा आरोप युवासेनेच्या माजी सिनेट सदस्यांनी केला आहे. या प्रकाराची त्वरीत दखल घेऊन कॉलेजवर कारवाईची मागणी करण्यात आली आली होती. अन्यथा आंदोलनाचा इशारा युवा सेनेने कुलगुरुंना दिलेल्या निवेदनात दिला होता.

विद्यापीठाने सर्वच संलग्नित महाविद्यालयांना परिपत्रक काढून राजकीय प्रचारापासून दूर राहण्याची सूचना केली. या पत्रानंतर युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, डॉ.धनराज कोहचाडे, कीसन सावंत, स्नेहा गवळी आणि शिवसेना उपनेत्या शितल शेठ देवरुखकर यांनी कुलगुरूंची भेट घेत ठाकुर कॉलेजवर कारवाईची मागणी केली.

विद्यार्थ्यांवर आकसाने कारवाई नको
ज्या विद्यार्थ्यांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवला, त्यांच्यावर आकसाने कारवाई होणार नाही, याची काळजी विद्यापीठाने घ्यावी, अशी सूचना युवा सेनेने केली आहे. त्यावर, अशी खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे.

Web Title: varsity orders disclosure within three days to Thakur College mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.