वरुण आणि सौम्या मुंबईचे नवीन पाहुणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 12:46 AM2020-01-05T00:46:33+5:302020-01-05T00:46:40+5:30
नवीन वर्षात काही नवीन पाहुणे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात दाखल होत आहेत.
मुंबई : नवीन वर्षात काही नवीन पाहुणे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात दाखल होत आहेत. नुकतेच कर्नाटकातून पट्टेदार तरसची जोडी प्राणिसंग्रहालयात मुक्कामाला आली आहे. त्यांचे दर्शन मुंबईकरांना पुढच्या महिन्यातच घेता येणार आहे.
राणीबागेचे नूतनीकरण सुरू असून या प्रकल्पांतर्गत १७ नवीन पिंजरे तयार करण्यात येत आहेत. दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आणण्यात आलेले हॅम्बोल्ट जातीचे पेंग्विन राणी बागेचे विशेष आकर्षण ठरले आहेत. प्रत्येकी ५० तर कुटुंबासाठी शंभर रुपये प्रवेश शुल्क करूनही पेंग्विनला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने राणीच्या बागेत येत असतात. मात्र एवढ्यावरच न थांबता आणखी काही नवीन पाहुणे आणण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
त्यानुसार काही महिन्यांपूर्वी बाराशिंगा राणीबागेत आले आहेत. त्यानंतर आता हिंस्र आणि चपळ म्हणून ओळखली जाणारी तरसाची जोडी २ जानेवारी रोजी आणण्यात आली आहे. प्राणिसंग्रहालयाला देणगी म्हणून कर्नाटकातील म्हैसूरच्या श्री चमाराजेंद्र प्राणीशास्त्र उद्यान येथून पट्टेधारी तरस भेट मिळाले आहेत. यामध्ये तीन वर्षांचा नर तरस वरुण आणि दोन वर्षांची मादी सौम्या या प्राण्यांचा समावेश आहे.
तरस जोडीस सद्यस्थितीत प्राणिसंग्रहालयाच्या कॉरंटाईन सुविधेमध्ये ठेवले आहे. पुढच्या महिन्यात त्यांना लोकांसमोर ठेवण्यात येणार आहे.
सडलेले आणि कुजलेले अन्न पचविण्याची त्यांची क्षमता असते. सध्या त्यांना चिकन आणि म्हशी-रेड्याचे मांस दिले जात आहे.
पट्टेधारी तरसाला (मराठीत तरस आणि हिंदीमध्ये लक्कडबग्गा या नावाने ओळखले जाते) पट्टेधारी तरस घनदाट जंगलात राहतात आणि ते वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या अनुसूची तीनमध्ये समाविष्ट आहेत. ते एकटे राहणारे आणि निशाचर प्राणी आहेत.
त्यांचे प्राणिसंग्रहालयातील आयुर्मान हे २५-२५ वर्षे असते. लोककथा आणि मुलांच्या कथांमध्ये तरसाला दुष्ट आणि वाईट म्हणून दर्शविले गेले असले तरी ते अन्नसाखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सर्वात उपयुक्त प्रजातींपैकी एक आहेत.