वरुणराजाने केले श्रीगणेशाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 02:45 AM2019-09-02T02:45:31+5:302019-09-02T02:46:00+5:30
शहरापेक्षा उपनगरात ‘जोरधार’: येते तीन दिवस कोकणात मान्सून सक्रिय
मुंबई : गेल्या २४ तासांत मुंबईसह लगतच्या परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली असून, पनवेल येथे १३ सेंटीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. परिणामी, वातावरणात दिवसभर गारवा होता. याच रिपरिप पावसासह गारव्यात मुंबई शहरासह उपनगरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती मंडपात दिमाखात विराजमान होत होत्या. दरम्यान, सोमवारस मंगळवार आणि बुधवारी संपूर्ण कोकणात मान्सून सक्रिय राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला आहे. महाबळेश्वरने रविवारी ७ हजार मिलीमीटर पावसाच्या नोंदीचा टप्पा पार केला आहे. मुंबईचा विचार करता, शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. पश्चिम उपनगरात बोरीवली, कांदिवली, गोरेगावसह पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंडसह पवईत दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. शहरात मात्र बहुतांश भाग कोरडा होता.
कोकणात रत्नागिरी, गोवा आणि माथेरानसह लगतच्या परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील नांदेड येथील दोन केंद्रांवर अतिमुसळधार पावसाची नोंद झाल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे. दुसरीकडे स्कायमेटकडील आकडेवारीनुसार, कोकणात चांगला पाऊस पडल्यामुळे १ जून ते ३१ आॅगस्ट दरम्यान कोकणात ३३ टक्के तर मध्य महाराष्ट्रात ५३
टक्के अतिरिक्त पाऊस पडला आहे. चांगल्या सरी बरसूनदेखील विदर्भ आणि मराठवाड्यात अनुक्रमे ४
टक्के आणि २६ टक्के पावसाची कमतरता आहे.
मुंबई अंदाज : २ सप्टेंबर : शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
३ सप्टेंबर : शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम पाऊस पडेल.
राज्य अंदाज
१ ते ३ सप्टेंबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
४ ते ५ सप्टेंबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.