वरवरा राव यांना ६ महिन्यांसाठी वैद्यकीय जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:08 AM2021-02-23T04:08:42+5:302021-02-23T04:08:42+5:30
एल्गार परिषद; उच्च न्यायालयाने दिला अंतरिम दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एल्गार परिषदप्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ कवी व ...
एल्गार परिषद; उच्च न्यायालयाने दिला अंतरिम दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एल्गार परिषदप्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ कवी व विचारवंत वरवरा राव यांना उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम दिलासा दिला. त्यांचे वय व प्रकृती विचारात घेऊन ६ महिन्यांसाठी त्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर केला. २८ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
राव यांचे उतार वय आणि तळोजा कारागृहात असलेल्या अपुऱ्या वैद्यकीय सोयी - सुविधा विचारात घेऊन राव यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात येत आहे. ताे नामंजूर केल्यास मानवी अधिकारांचे संरक्षणकर्ते व राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत नागरिकांना असलेल्या चांगले आरोग्य राखण्यासारख्या वैधानिक कर्तव्याचा आम्ही त्याग केल्यासारखे होईल, असे निरीक्षण न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने नोंदविले.
राव यांची प्रकृती अस्थिर आहे. त्यामुळे त्यांना तळोजा कारागृहात परत पाठविणे जोखमीचे आहे. त्यांची जामिनावर सुटका केल्यास त्याचा या प्रकरणातील अन्य आरोपी गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून काही अटी घालून त्यांचा जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने सांगितले. ते हैदराबादचे असले तरी त्यांना मुंबई विशेष न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य करता येणार नाही. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधू नये किंवा त्यांना कोणतीही माहिती देऊ नये. या दरम्यान ते आंतरराष्ट्रीय कॉल करू शकत नाहीत. बोलावल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर राहावे लागेल, अशा अटी उच्च न्यायालयाने घातली. जामिनाची मुदत संपल्यावर ते न्यायालयात शरण जाऊ शकतात किंवा जामिनाची मुदत वाढविण्यासाठी अर्ज करू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने राव यांची ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर सुटका केली. या आदेशावर तीन आठवड्यांची स्थगिती देण्याची विनंती एनआयएच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी केली. परंतु, न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली.
१८ नोव्हेंबर २०२० पासून राव नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तळोजा कारागृहात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने जामिनावर सुटकेसाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यांच्या पत्नी हेमलता यांनीही राव यांच्यावर योग्य उपचार करण्यात येत नसल्याने त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन हाेत असल्याचे म्हणत उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती.
.......................