लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एल्गार परिषद व कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी अटकेत असलेले ज्येष्ठ कवी व विचारवंत वरवरा राव यांना उपचारांसाठी नानावटी रुग्णालयात १५ दिवस दाखल करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे.
न्या. एस. एस. शिंदे व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने मध्यस्थी केल्यानंतर राज्य सरकार राव यांना विशेष केस म्हणून तळोजा कारागृहातून नानावटीत हलविण्यास तयार झाले. मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी सांगितले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राव यांना उपचारांसाठी नानावटीत हलविण्यास हरकत नसल्याचे सांगितले.
राव यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना तळाेजा कारागृहातून नाॅनावटी रुग्णालयात दाखल करावे, यासाठी राव यांची पत्नी हेमलता यांनी याचिका दाखल केली. एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले की, जे. जे. रुग्णालयातही चांगले उपचार होऊ शकतील. त्यांना नानावटीत नेले तर चुकीचा पायंडा पडेल. अन्य आरोपींनाही आपल्याला नानावटीमध्ये उपचार मिळावेत, असे वाटेल. मात्र, न्यायालयाने राव यांना नानावटीमध्ये १५ दिवस उपचार करण्याचे निर्देश दिले.
उपचारांचा खर्च सरकारचाजो माणूस मृत्युशय्येवर आहे, ज्याला उपचारांची गरज आहे त्याला राज्य सरकार ‘नाही’ कशी म्हणू शकते? आम्ही केवळ एवढेच म्हणतो की, केवळ दोन आठवड्यांसाठीच त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करा. दोन आठवड्यांनंतर तब्येतीत काय सुधारणा आहे ती बघू, असे न्यायालयाने म्हटले. राव यांच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच न्यायालयाला कळविण्यापूर्वी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार नाही, असे निर्देशही खंडपीठाने दिले.