Join us

वसई मनपात पदमंजुरी, मात्र भरती प्रक्रिया नाही

By admin | Published: May 02, 2015 10:58 PM

अपुऱ्या मनुष्यबळामुळे महानगरपालिका प्रशासनाला विकासकामे करताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे नगरसंचालनालयाकडून पदमंजूरी

दीपक मोहिते, वसईअपुऱ्या मनुष्यबळामुळे महानगरपालिका प्रशासनाला विकासकामे करताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे नगरसंचालनालयाकडून पदमंजूरी देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात भरती प्रक्रियाच झाली नाही. येथे १ हजार ६१० पदे रिक्त आहेत. प्रशासनाला वर्षाकाळी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. तर दुसरीकडे यातील काही कर्मचाऱ्यांचे वयोमान झाल्यामुळे त्यांना सेवेत सामावून घेणे अशक्य होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात असून भरती प्रक्रिया आणखी काही महिन्यांसाठी रखडण्याची शक्यता आहे.वसई विरार शहर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या नवघर-माणिकपूर, नालासोपारा, वसई व विरार या चार नगरपरिषदेमध्ये सुमारे दीड हजारावर कर्मचारी ठेक्यावर कार्यरत होते. कालांतराने त्यांना महानगरपालिकेच्या ठेक्यात सामावून घेण्यात आले. यामध्ये आस्थापना, दिवाबत्ती, करवसुली, पाणीपुरवठा, अग्निशमन, आरोग्य, तांत्रिक, समाजकल्याण, बांधकाम, एलबीटी व अन्य विभागांचा समावेश आहे. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर येथील प्रशासनाने पदमंजूरीचा शासनाकडे प्रस्ताव पाठवला. यावर सप्टेंबर २०१४ मध्ये शासनाकडून मंजुरी मिळाली. मात्र नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे. परिणामी विकासकामे मार्गी लावताना मनपा प्रशासनाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.