वसई : सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर महानगरपालिकेचे कामकाज आता रुळावर आले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे तसेच आचारसंहितेच्या अंमलामुळे विकासकामे ठप्प झाली होती. सोमवारी महापौरपदाची निवडणूक पार पडली की विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. नंतर शहरातील विकासकामे आचारसंहितेच्या बडग्यामुळे बंद पडली होती. निवडणुकीचा निकाल लागताच आचारसंहिता काढून घेण्यात आली त्यामुळे आता शहरातील विकासकामे वेगाने सुरू होतील. महानगरपालिकेने गेल्या काही दिवसात रस्ते, गटारे व अन्य विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. पावसाळा संपला कि सर्व कामे सुरू करण्यात येणार आहेत. सॅटेलाईट सिटी योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून विरार शहरातील भूमिगत गटार योजना जवळपास पूर्ण होत आली आहे. नालासोपारा व वसई शहरातही पावसानंतर भुमीगत गटारांच्या कामांना सुरूवात होईल असा अंदाज आहे. भूमिगत गटारांमुळे यंदा विरार शहरामध्ये पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होऊ शकला. तसेच शहराच्या काही भागात रस्ता रूंदीकरण व पथदिवे लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या उपप्रदेशाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने विकासकामांमध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत असा विश्वास महापौर नारायण मानकर यांनी व्यक्त केला. जिल्हापरिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रे ही महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यासाठी आ. हितेंद्र ठाकूर प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)
वसई मनपाचे कामकाज रुळावर
By admin | Published: June 27, 2015 11:42 PM