वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेस मंजुरी देण्यात आली आहे. एकूण ६३ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी ६१ हरकती निकाली काढण्यात आल्या तर उर्वरित दोन हरकतींमध्ये दोन प्रभागात किरकोळ बदल करण्यात आले. जून महिन्याच्या मध्यास होणाऱ्या या निवडणुकांसाठी सध्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. हे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आयोगातर्फे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल असा अंदाज आहे.निवडणूक आयोगाने गेल्या महिनाभरात महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची जोरदार तयार चालवली आहे. प्रभाग रचनेस अंतिम मंजुरी मिळाल्यामुळे लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे जूनच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुका होतील, असा अंदाज आहे. आरक्षणाचा फटका बसला असता तरी बविआचे अजीव पाटील, सुदेश चौधरी, भरत मकवाना, नितीन राऊत भरत गुप्ता, जितेंद्र शहा, प्रफुल्ल साने, पंकज ठाकूर, भारती देशमुख, रुपेश जाधव, संदेश जाधव, सुषमा ठाकूर, डॉ. हेमंत पाटील यांना इतर प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर डॉ. वसंत मांगेला, नरेंद्र पाटील, नितीन मुळे, सीमा काळे साथीराज नाहटा, हरिश्चंद्र पाटील, प्रा देसाई, नरेश जाधव, सगीर बांगे, विजय राणे, अनिल भोगले, मुनीर खान, बंसनारायण मिश्रा, पंडीत पाटील, चंद्रकांत गोरीवले, किशोर धुमाळ, महमद खाटीक, रमेश घोरकना, दिनेश भानुबाला, संदीप पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळणे कठीण आहे. सेना-भाजपा युतीचे राजन नाईक, शिरीष चव्हाण, वसंत वैती, जनआंदोलन समितीचे विनायक निकम, संजय कोळी, राजकुमार चोरघे, प्रवीण भोईर या सर्वांना आरक्षणाचा फटका बसला असून ही मंडळी सुरक्षित प्रभागाच्या शोधात आहेत. (प्रतिनिधी)
वसई महापालिकेच्या प्रभागांना मंजुरी
By admin | Published: May 01, 2015 10:33 PM