Join us

वसई रेल्वे उड्डाणपुलाचे उदघाटन

By admin | Published: June 26, 2016 1:34 AM

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटीत होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या वसई रेल्वे उड्डाणपूलाचे अखेर आज सकाळी पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अगदी घाईघाईने करण्यात

वसई : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटीत होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या वसई रेल्वे उड्डाणपूलाचे अखेर आज सकाळी पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अगदी घाईघाईने करण्यात आलेल्या उद्घाटन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका न छापल्याने भाजप आणि बहुजन विकास आघाडी वगळता इतर सर्वपक्षीयांनी या सोहळ्याकडे मात्र पाठ फिरवली. उड्डाणपूल वाहतूकीस खुला झाल्याने वाहनचालक आणि पोलिसांनी मात्र सुटकेचा श्वास सोडला.गेली नऊ वर्षे रखडून पडलेला वसई रेल्वे उड्डाणपूलाचा उद्घाटनाचा मोठा गाजावाजा झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या जनतेने १५ जूनला स्वत:हूनच पूल वाहतूकीला खुला करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर मनसे, जन आंदोलन समिती, राष्ट्रवादी काँग्रेसने उद्घाटनाचे कार्यक्रम घेऊन राजकीय वातावरण तापवले होते. खरे तर एमएमआरडीए आणि भाजपासह बहुजन विकास आघाडीला पूलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते व्हावे असेच वाटत होते. पण, उद्घाटनाचा राजकीय वादंग झाल्याने मुख्यमंत्र्यानी उद्घाटनासाठी येण्याचे टाळले. शेवटी दोन दिवसांपूर्वी एमएमआरडीने पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी साडेअकरा वाजता मुसळधार पावसात पालकमंत्र्यांच्या हस्ते पूलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार चिंंतामण वनगा, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार विलास तरे यांच्यासह पालिका आयुक्त सतीश लोखंडे, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, प्रांताधिकारी दादाराव दातकर, तहसिलदार गजेंद्र पाटोळे उपस्थित होते. यावेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसहीत जनआंदोलन समिती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, जनता दल आदींचे पदाधिकारी हजर नव्हते. उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नसल्याचे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर आयत्यावेळी अगदी साधेपणाने उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पत्रिका छापण्यात आली नसल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. कसे का असेना एकदाचे उद्घाटन झाले म्हणून जनता मात्र आनंदीत झाली आहे. (प्रतिनिधी)