मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरून वसई रोड ते उत्तरप्रदेशमधील गोरखपूरसाठी सुटलेली श्रमिक विशेष ट्रेन ओडिसामधील रुरकेला येथे पोहचल्याने मजुरांमध्ये गोंधळ उडाला. मात्र, वाहतुककोंडी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ट्रेनच्या मार्गात बदल केला असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
पश्चिम रेल्वे मार्गावरून २१ मे रोजी वसई रोड ते गोरखपूर ट्रेनमधले प्रवासी शुक्रवारी सायंकाळी गोरखपूर स्थानकात पोहोचणार होते. मात्र, शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास रुरकेला स्थानकावर पोहोचल्याचे लक्षात आले. सुमारे ३६ तास प्रवास केल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये नसून ओडिशामध्ये पोहोचल्याने मजूर गोंधळून गेले. कोणतीही पूर्वकल्पना न देता ट्रेन चालविण्यात आली. मजुरांनी ट्रेनचा लोको पायलट रस्ता चुकल्याचा आरोप केला. दरम्यान, रेल्वे बोर्डाने इटासरी-जबलपुर-पंडीत दीनदयाल नगर या मार्गावर झालेली वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या गाड्यांच्या मार्गात बदल केला. त्यामुळे ही ट्रेन रुरकेला स्थानकात पोहोचल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.
देशभरात सुमारे २ हजार श्रमिक ट्रेनमधुन ४५ लाख मजुरांना त्याच्या मूळगावी पोहोचविण्यात आले आहे. ट्रेन स्थानकात पोहोचल्यानंतर ती खाली करण्यासाठी ४ ते ५ तास लागतात. मजुरांची स्थानिक प्रशासनातर्फे आरोग्य तपासणी केली जाते. त्यामुळे दुसरी ट्रेन स्थानकात येऊ शकत नाही. परिणामी गाड्यांचे बंचिग झाले असल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेला एखादा व्यस्त मार्ग टाळण्यासाठी इतक्या लांब भलत्याच राज्यात जाऊन यु- टर्न मारावा लागतो हे कोणाला माहिती नसल्यामुळे हा सगळा गोंधळ होतो, असे देखील स्पष्ट रेल्वेने केले.
--------------------------------
सर्वाधिक श्रमिक ट्रेन उत्तरप्रदेश आणि बिहारला जात आहेत. मात्र या गाड्या नियोजित वेळच्या दोन दिवस उशिरा पोहचत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून एका वेळेचे जेवण देण्यात येत असल्यामुळे मजुरांची उपासमार होत आहे. लहान मुले, स्त्रिया,वयोवृद्ध यांचे हाल होत आहेत. गाड्या वाटेतच दोन-तीन तास एकाच ठिकाणी थांबत असल्याने प्रवाशांना गाडीतच बसून रहावे लागते. त्यातच कोचमध्ये पंख्याची पुरेशी सोय नसल्यामुळे उन्हाचा त्रास प्रवाशांना होत आहे.
-----------------------------------
वसई-गोरखपुर ट्रेन कल्याण-जळगाव-भुसावळ-खंडवा-इटासरी-जबलपुर-माणिकपुर मार्गे जाणार होती. मात्र हा मार्ग व्यस्त असल्याने इटासरी-जबलपुर-पंडीत दीनदयाल नगर मार्गावर ट्रेनच्या एका मागोमाग एक रांगा लागल्या होत्या. या कारणास्तव हि गाडी बिलासपुर, झारसुंगडा, रुरकेला, अद्र, आसनसोल मार्गे गोरखपुरला रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला.