दाऊद, छोटा राजनपेक्षा वसईचे ठाकूर मोठे नाहीत; प्रदीप शर्मा यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 02:39 AM2019-09-14T02:39:49+5:302019-09-14T02:40:00+5:30
शिवसेनेने उमेदवारी दिल्यास मोहीम फत्ते करेन
ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन, बबलू श्रीवास्तव किंवा लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी यासारखे गँगस्टर आणि दहशतवाद्यांशी दोन हात केल्याने माझ्यासाठी वसईची ठाकूर मंडळी त्यापेक्षा मोठी नाही. त्यामुळे नालासोपाऱ्यातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यास ती मोहीमही फत्ते करेनच, असे उद्गार एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी शुक्रवारी ठाण्यात बोलताना काढले.
शुक्रवारी शर्मा यांनी पोलीस खात्याला रामराम ठोकला. ते दुपारी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक कार्यालयात आले होते. यावेळी तेथील त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकाऱ्यांची भेट घेऊन ते मातोश्रीकडे रवाना झाले. तत्पूर्वी बोलताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पक्षाने नालासोपारा येथून उमेदवारी दिल्यास ती मोहीमही नक्कीच फत्ते करेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करून ३६ वर्षे केलेली पोलीस सेवा सोडताना खूप दु:ख होत असल्याचेही सांगितले.
बाळासाहेबांच्या प्रेमापोटी शिवसेना निवडली
स्व. बाळासाहेबांनी वेळोवेळी केलेल्या प्रेमापोटी आपण शिवसेना हा पक्ष निवडला आहे. तसेच मी जेव्हा निलंबित झालो होतो, तेव्हा ‘धाडसाची धिंड’ हा बाळासाहेबांनी अग्रलेख लिहिला होता. तो मी आजही सांभाळून ठेवला आहे. मी जेव्हा साडेतीन वर्षे जेलमध्ये होतो, तेव्हा मला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी जी मदत केली, ती मी कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करीत आहे. मला शिवसेनेकडून बोलावणे आले आहे. त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझ्यावर जी जबाबदारी टाकतील, ती मी पार पाडायला तयार असल्याचेही शर्मा यांनी स्पष्ट केले.