‘मुंबईत जोरदार, वसई तुंबली; नागरिकांचे झाले मेघा’हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 02:40 AM2019-07-25T02:40:37+5:302019-07-25T02:41:04+5:30
ठाणे, नवी मुंबई, पनवेललाही पावसाने झोडपले
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र बऱ्याच दिवसांपासून विश्रांतीवर असलेला पाऊस मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभर जोरदार कोसळला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. रस्ते, रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. मुसधार पावसामुळे वसई तुंबली. याशिवाय ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्येही जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांचे ‘मेघा’ हाल झाले.
कल्याणमधील १०० घरांत शिरले पाणी
ठाणे जिल्ह्यातील ठिकठिकाणी मंगळवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. ठाणे शहरात ठिकठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. कल्याण पूर्वेतील आडीवली-ढोकळी परिसरातील चाळींमधील जवळपास १०० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले. भिवंडी, उल्हासनगरातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ठिकठिकाणी पाणी साचले होते. मागील २४ तासात ठाणे जिल्ह्यात सरासरी १०९ मीमी पावसाची नोंद करण्यात आली असून, रेल्वेचे वेळापत्रक पावसामुळे कोलमडले होते.
ऐरोली, सानपाड्यातील सखल भागात साचले पाणी
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने बुधवारी पुन्हा नवी मुंबईकरांना झोडपले. पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर तसेच रहिवासी भागात पाणी साचले होते, तर तुर्भे येथे पावसामुळे जमीन ओलसर होऊन भूमिगत विद्युत वायरीचा शॉक लागून सहा शेळ्या मृत पावल्याची घटना घडली. बुधवारी पहाटेपासूनच सुरू झालेली पावसाची मुसळधार रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
ऐरोली, सानपाडा, तळोजा, तुर्भे, एपीएमसी यासह कोपरखैरणे व इतर ठिकाणच्या सखल भागात दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचले होते. यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली, तर ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे येथे बर्फाच्या ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
असल्फा येथे झोपड्यांवर दरड कोसळली; जीवितहानी नाही
मुंबई शहर आणि उपनगरात थांबून थांबून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाच पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी साडेबाराच्या सुमारास असल्फा व्हिलेज येथील वाल्मिकी नगरातल्या ८ ते १० झोपड्यांवर दरड कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. महत्त्वाचे म्हणजे सुरक्षेच्या कारणात्सव दुर्घटनेनंतर येथील ८ ते १० झोपड्यांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.
दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पुरेशी मदत रवाना करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच गोरेगाव पूर्व येथील दिंडोशीमधील राजीव गांधी नगरात जमीन खचून तळमजला अधिक एक मजली बांधकाम कोसळले. कोसळलेले बांधकाम रिकामे असल्याने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील ३५ झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या असून येथील नागरिकांची तात्पुरती व्यवस्था पालिकेच्या शाळा तसेच बालवाड्यांमध्ये करण्यात आली आहे.
उपनगरी लोकलला पाऊण तासाचा ‘लेट मार्क’
मुंबई उपनगरी भागात बुधवारी सकाळी तीन तासांचा जोरदार पाऊस पडल्याने, मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. सायन स्थानकात पाणी तुंबल्याने मध्य रेल्वे मार्गावरील लोकल पाऊण तासाने उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
उपनगरीय भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन स्थानकात पाणी तुंबल्याने लोकलसेवा उशिराने धावत होती. धिम्या आणि जलद लोकल ३० ते ४५ मिनिटांनी उशिराने धावत होत्या. परिणामी, प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास उशीर झाला. हार्बर मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटांनी आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ५ मिनिटे उशिराने धावत होत्या.