Join us

वसई-विरारच्या निवडणुकीत ९९ उमेदवार कोट्यधीश

By admin | Published: June 11, 2015 11:00 PM

विकासाच्या नावाने बोंब असली तरी वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत ३२९ पैकी ९९ म्हणजे ३० टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत.

वसई : विकासाच्या नावाने बोंब असली तरी वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत ३२९ पैकी ९९ म्हणजे ३० टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. ९ उमेदवारांकडे १० कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे, तर दोन उमेदवारांकडे १०० कोटींहून अधिक मालमत्ता आहे. विशेष म्हणजे बबिआच्या उमेदवार प्रवीणा ठाकूर यांची १५८ कोटी ८१ लाखांची मालमत्ता असून त्या सर्वात श्रीमंत आहेत. मात्र, त्यांनी पॅन क्रमांक दिलेला नाही.ठाकूर यांच्या खालोखाल वॉर्ड क्र. ३१ मधील पंकज भास्कर ठाकूर यांची मालमत्ता असून ती १२५ कोटी, १३ लाख इतकी आहे. वॉर्ड क्रमांक ९४ मधील बविआचे उमेदवार पंकज नारायण चोरघे यांची मालमत्ता ३० कोटी, ४५ लाख इतकी आहे. भाजपाचे वॉर्ड क्र. ४२ मधील कमलाकर अनंत पाटील यांची मालमत्ता २७ कोटी ७९ लाख आहे. तर आघाडीचेच उमेश दत्तात्रेय नाईक हे वॉर्ड क्र. ४८ मधील उमेदवार २५ कोटी ७६ लाख एवढ्या मालमत्तेचे धनी आहेत. सर्वात श्रीमंत अशा पाच उमेदवारांपैकी चार उमेदवार आघाडीचे आहेत.कोट्यधीश उमेदवारांची पक्षनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. आघाडीच्या १०० उमेदवारांपैकी ५४ उमेदवार कोट्यधीश आहे. काँग्रेसच्या ३४ पैकी ७ उमेदवार कोट्यधीश आहेत. शिवसेनेचे ७० पैकी १४ उमेदवार कोट्यधीश आहेत, तर भाजपाचे २८ पैकी ९ उमेदवार कोट्यधीश आहेत. कम्युनिस्ट पक्षाचा एकच उमेदवार उभा असून तो कोट्यधीश आहे. राष्ट्रवादीच्या १० उमेदवारांपैकी एकच कोट्यधीश आहे. एवढेच कशाला, ६४ अपक्षांपैकी ११ अपक्ष कोट्यधीश आहेत. महापालिकेतील उमेदवारांची सरासरी मालमत्ता २.३० कोटी इतकी आहे, तर पाच उमेदवारांनी आपल्याकडे १० हजारांपेक्षा कमी किमतीची मालमत्ता आहे, असे घोषित केले आहे. सर्वात कमी मालमत्ता असलेल्या बसपाच्या सीमा विश्राम तांबे या वॉर्ड क्र. ११२ मधील उमेदवाराकडे फक्त एक हजारांची मालमत्ता आहे. आघाडीच्या वॉर्ड क्र. ५८ च्या नीलिमा आनंद कांबळे यांच्याकडे १५०० रुपयांची, तर वॉर्ड क्र. ११५ मधील अपक्ष मदन हर्षा गोवारी यांच्याकडे ५०० रुपयांची मालमत्ता आहे. (विशेष प्रतिनिधी)