वसई-विरार गारठले
By admin | Published: January 4, 2015 11:40 PM2015-01-04T23:40:55+5:302015-01-04T23:40:55+5:30
गेल्या १५ दिवसांपासून वसई-विरार मध्ये थंडीचा जोर, वाढला आहे. ग्रामीण भागातील जनतेला थंडीचा सामना करण्यासाठी शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे
वसई : गेल्या १५ दिवसांपासून वसई-विरार मध्ये थंडीचा जोर, वाढला आहे. ग्रामीण भागातील जनतेला थंडीचा सामना करण्यासाठी शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. जंगलपट्टी परिसरात थंडीने उच्चांक गाठला आहे. रात्रभर जाणवत असणाऱ्या या थंडीचा प्रभाव सकाळी ११ वाजेपर्यंत जाणवतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहारावरही त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. ग्रामीण भागात सकाळी ११ वाजेपर्यंत गावा-गावांमध्ये शुकशुकाट असतो. तर शाळकरी मुले थंडीमध्ये कुडकुडत आपल्या शाळा गाठत असतात.
वसई-विरार मध्ये नायगाव ते थेट अर्नाळा विरार दरम्यान निसर्गसुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. मान्सुन, हिवाळा व उन्हाळा या तीनही मोसमामध्ये या परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. विशेष करून हिवाळ््यामध्ये या परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा थंडीच्या कडाक्यातही पर्यटकांनी तसूभरही कमी झाली नाही. गेला आठवडाभर पहाटेच्या सुमारास ग्रामीण भागातील शेती व बागायतीवर दवबिंदू पहावयास मिळाले. धुक्याच्या चादरीने संपूर्ण परिसर झाकला गेला. दुपारी १२ नंतर धुके निवळले. परंतु, वातावरणातील गारवा मात्र कायम होता.या वातावरणाचा परिणाम मात्र, ग्रामीण व जंगलपट्टी भागात बऱ्यापैकी होत आहे. गावा गावातील दैनंदिन व्यवहार सकाळी ११ वाजेपर्यंत सूरू होत नाहीत. या थंडीचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. स्वेटर्स परिधान करूनही कुडकुडत शाळेत यावे लागते. (प्रतिनिधी)