ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २० : भारतातील राष्ट्रीय स्तरावरील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी वसई - विरार महापौर मॅरेथॉन आगामी ११ डिसेंबरला रंगेल. सहावे वर्ष असलेल्या यंदाच्या स्पर्धेत एकूण १५ हजार धावपटूंचा सहभाग होतील, अशी माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली.
मंगळवारी मुंबईत मराठी पत्रकार संघ येथे वसई - विरार महानगरपालिकेच्या प्रहिल्या महिला महापौर प्रविणा ठाकूर यांनी स्पर्धेची माहिती दिली. वसई - विरार महानगरपालिका आणि वसई तालुका कला - क्रीडा विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या या स्पर्धेतून स्त्रीभ्रूण हत्या टाळा व निसर्गाचा नियम पाळा असा सामाजिक संदेश देण्यात येणार आहे.दोन प्रमुख गटात होणाऱ्या या स्पर्धेत पुर्ण मॅरेथॉन आणि अर्ध मॅरेथॉन अशा पुरुष व महिलांच्या शर्यती होतील. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवलेले बलाढ्य खेळाडूंचा सहभाग दरवर्षी या मॅरेथॉनला मिळत असल्याने यंदा देखील प्रमुख धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली.
तसेच खेताराम, ललिता बाबर, कविता राऊत यांसारख्या आॅलिम्पियन धावपटूंनीही ही स्पर्धा गाजवली असल्याने त्यांच्या सहभागाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूण ३५ लाख रक्कमेची रोख पारितोषिके असलेल्या या स्पर्धेत पुर्ण मॅरेथॉनच्या विजेत्या पुरुष व महिला धावपटूला प्रत्येकी अडीच लाख रुपयाचे बक्षिस पटकावण्याची संधी आहे. तर, अर्ध मॅरेथॉन विजेत्या पुरुष व महिला धावपटूला १ लाख २५ हजार रुपयांचे रोख बक्षिस मिळेल. स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर १५ आॅक्टोबरपासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रीया सुरु होईल, असेही आयोजकांनी यावेळी संगितले.