वसई-विरार उपप्रदेशातील घरांचे भाव गगनाला भिडणार!
By admin | Published: January 2, 2015 10:53 PM2015-01-02T22:53:03+5:302015-01-02T22:53:03+5:30
राज्य सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीला रेडीरेकनर दरात सुमारे २० टक्क्यांची वाढ केल्यामुळे वसई-विरार उपप्रदेशातील सदनिकांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत.
दीपक मोहिते ल्ल वसई
राज्य सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीला रेडीरेकनर दरात सुमारे २० टक्क्यांची वाढ केल्यामुळे वसई-विरार उपप्रदेशातील सदनिकांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत. बांधकाम व्यवसायात सध्या मंदीचे वातावरण असतानाच जागांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बांधकाम क्षेत्रामध्ये आहे. आजमितीस वसई-विरार उपप्रदेशात हजारो सदनिका विक्रीअभावी बंद पडून आहेत.
रेडीरेकनरच्या दरात भरमसाट वाढ झाल्यामुळे वसई-विरार उपप्रदेशात ग्राहकांना सदनिकेमागे दोन ते अडीच लाख रुपये जादा द्यावे लागणार आहेत. सध्या वसई-विरारमधील सदनिकांचे दर ५ हजार ते ६ हजार रु. प्रति चौ. फूट झाले आहेत. ग्रामीण भागातही प्रतिस्क्वअर फुटाला ४ हजार रु. मोजावे लागतात. सरकारच्या या नवीन निर्णयामुळे सदनिकांच्या भावामध्ये प्रचंड वाढ होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. हे दर वाढल्याने २५ लाखांना मिळणारी ५०० चौ. फुटांची सदनिका आता २७ ते २८ लाखांना खरेदी करावी लागणार आहे. याचा विपरीत परिणाम बांधकाम व्यवसायावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून बांधकाम व्यवसायामध्ये प्रचंड मंदी आली असून बांधकाम व्यावसायिक ग्राहक नसल्यामुळे हवालदिल झाले
आहेत.