वसई-विरारकर वाहतूककोंडीने हैराण
By admin | Published: July 11, 2015 11:13 PM2015-07-11T23:13:27+5:302015-07-11T23:13:27+5:30
वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरण झाले असले तरी वाहतुकीचे नियोजन होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. वाहनचालकांची कागदपत्रे तपासण्यापलीकडे ते काही करीत नसल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
वसई-विरार महानगरपालिका हद्दीत वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. एकीकडे अनधिकृत रिक्षांची गर्दी तर दुसरीकडे वाहनांच्या संख्येत भरमसाट वाढ यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न भीषण झाला आहे. काही वर्षांपूर्वी वाहतुकीचे नियंत्रण करण्याकरिता वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. परंतु, वाहतूक विभागाचे पोलीस केवळ वसुलीच्या मागे असल्यामुळे वाहतुकीचे नियंत्रण योग्य पद्धतीने होत नाही.
वसई रोड, विरार व नालासोपारा रेल्वे स्थानकांनजीक सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. महानगरपालिका हद्दीत अनेक पॉइंट असे आहेत, जेथे चार रस्ते एकत्र येतात. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करणे गरजेचे आहे. परंतु, वाहतूक पोलीस ऐन गर्दीच्या वेळी कर्तव्यावर हजर नसतात. त्यामुळे आता महानगरपालिकेने सिग्नल यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांच्या गैरप्रकारामुळे नागरिक वैतागले असून नागरिकांनी शहरात आता सिग्नल व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी केली आहे.