नालासोपारा : जपानमध्ये आढळणाऱ्या दुर्मिळातील दुर्मीळ कावासाकी तापाचा रुग्ण वसईत आढळला असून या ८ महिन्यांच्या बाळावर मीरा रोड येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करून त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. केवळ पाच वर्षांखालील लहान मुलांमध्ये आढळणारा हा आजार प्रामुख्याने आशिया खंडात मोठ्या संख्येने जपानमध्ये दिसून येतो.
वसई येथे राहणाºया ८ महिन्यांच्या संदेशला (नाव बदललेले आहे) १० दिवसांपासून ताप येत होता. वसईतील दोन रुग्णालयांमध्ये उपचार करूनही त्याला बरे वाटत नसल्याने त्याला मीरा रोड येथील खाजगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अंकित गुप्ता यांच्या देखरेखीखाली उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णाचे वय पाहता त्याचे प्राण वाचविणे हा मुख्य उद्देश होता. रुग्णालयातील उपलब्ध असलेल्या आधुनिक प्रणालीमुळे आठ दिवसांच्या प्रयत्नांना यश आले असून दोनच दिवसांपूर्वी त्याला घरी सोडले आहे.भारतामध्ये एक लाखामध्ये १० बालकांना हा दुर्मीळ आजार होतो तर जपानमध्ये हेच प्रमाण १३० आहे. सत्तरच्या दशकात जपानमध्ये या तापाने धुमाकूळ घातला होता. जपानमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. टोमीसाकू कावासाकी या डॉक्टरांनी १९६७ साली या तापाविषयी मेडिकल जनरलमध्ये माहिती दिली होती.या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी १९९९ साली डॉ. टोमीसाकू कावासाकी यांनी कावासाकी रिसर्च सेंटरची स्थापना केली होती म्हणूनच या तापाला ‘कावासाकी’ असे त्या डॉक्टरांचे नाव ठेवण्यात आले होते. १९६० मध्ये जपानमध्ये या तापाचा पहिला रुग्ण आढळला होता.‘कावासाकी’ म्हणजे काय?याविषयी अधिक माहिती देताना डॉ. अंकित गुप्ता म्हणाले की, या तापाचा सर्वांत मोठा दुष्परिणाम हृदयावर होतो. या प्रकारच्या तापामध्ये हृदयाला रक्त पोहोचविणाºया रक्तवाहिन्यांमध्ये इजा होतात म्हणजेच त्यांना सूज येते. औषधे घेऊनसुद्धा कमी न होणारा ताप, गळ्याच्या आत गाठी येणे, जीभ लाल होणे, यकृताला सूज येणे, पेशी झपाट्याने वाढणे ही लक्षणे दिसून येतात.