Join us

वसईचा ख्रिस्ती ‘संत गोन्सालो गार्सिया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:05 AM

---------दूर देशी राहणाऱ्या एका राजासाठी हे पोर्तुगीज अधिकारी अहोरात्र झटत होते. त्यांचा वा त्यांच्या राजाचा स्थानिकांशी यापूर्वी फारच ...

---------

दूर देशी राहणाऱ्या एका राजासाठी हे पोर्तुगीज अधिकारी अहोरात्र झटत होते. त्यांचा वा त्यांच्या राजाचा स्थानिकांशी यापूर्वी फारच थोडा संबंध आला होता. यापूर्वीचे युरोपीय हे प्रामुख्याने खलाशी अथवा व्यापारी होते. साम्राज्यविस्ताराच्या धोरणाने ते येथे यापूर्वी आले नव्हते. त्यांची शासन पद्धती, सामाजिक मूल्ये, राहणीमान सगळेच वेगळे होते. दूर देशीच्या राजासाठी शासन सांभाळणाऱ्या या अधिकाऱ्यांना स्थानिक राजे, सरंजाम, वतनदार या साऱ्यांचे सोयरसुतक नव्हते. त्यांच्या वसाहती वेगळ्या असत. तेथे स्थानिकांना फारसा प्रवेशही नसे. पोर्तुगीजांचे धर्मप्रसाराचे वेड हे त्यांचे वेगळेच वैशिष्ट्य होते. त्यांच्या साधारण दोनशे वर्षांच्या मुंबई परिसरातील राज्यकाळात हजारो स्थानिकांचे धर्मांतर झाले.

अतिशय प्रभावी धर्मप्रसारक म्हणून ज्ञात असलेल्या संत फ्रान्सिस झेवियर्स यांनी वसईला तीन वेळा भेट दिली होती. १५६० च्या सुमारास गोव्यात इन्क्वेझिशन कार्यालयाची स्थापना झाली आणि त्याचे पडसाद मुंबईतही उमटले. परिसरातील अनेक प्राचीन मठ-मंदिरे उद्ध्वस्त झाली. गावेच्या गावे धर्मांतरित झाली. विविध स्थळ माहात्म्ये आणि मौखिक परंपरांतून स्थानिकांनी सांस्कृतिक इतिहास जपण्याचा प्रयत्न केला.

पोर्तुगीजपूर्व काळापासून एक व्यापारी बंदर व तीर्थ म्हणून नावारूपाला आलेल्या सोपारा परिसरावर ख्रिस्ती धर्मगुरूंनी आपली मोहर उमटवली आणि एका सांस्कृतिक संश्लेषणाची सुरुवात झाली. वसईच्या किल्ल्यात राहणाऱ्या एका पोर्तुगीज सैनिकाचा एका आगाशी गावात राहणाऱ्या स्थानिक महिलेशी विवाह झाला. सन १५५७ मध्ये त्यांना एक मुलगा झाला. किल्ल्यातील जेस्युईट मिशनरी शाळेत शिक्षण घेत, चर्चमध्ये जात एका धार्मिक वातावरणात तो मोठा होत होता. ख्रिस्ती मिशनऱ्यांबरोबर सुदूर देशात जाण्यासाठी समुद्र त्याला साद घालत होता. वयाच्या पंधराव्या वर्षी सबास्टिओ गोनसाल्वीय या धर्मप्रचारकाच्या अनुज्ञेने त्याने वसई सोडली. तो इतर काही धर्मप्रचारकांबरोबर जपानला गेला. प्रवासातच त्याने जपानी भाषा शिकली व तेथे पोहोचल्यावर स्थानिक भाषेत अत्यंत प्रभावीपणे धर्मप्रचाराचे कार्य सुरू केले. जेस्युईट परंपरेत दीक्षा घेऊन धर्मकार्याला वाहून घेण्याचा त्याचा मानस होता. हे शक्य झाले नाही तेव्हा त्याने व्यापार सुरू केला. थोड्याच काळात तो प्रथितयश व्यापारी म्हणून नावारूपाला आला. कालांतराने त्याला फ्रान्सिस्कन परंपरेची दीक्षा मिळाली आणि तो एक प्रभावी धर्मप्रचारक बनला. पुढे जपानी राजाचे कान भरल्यामुळे या संताला त्याच्या इतर २५ सहकाऱ्यांसह देहान्ताची सजा देण्यात आली. भारतीय वंशाच्या या पहिल्या ख्रिस्ती संताचे नाव होते ‘गोन्सालो गार्सिया’. सन १८६२ मध्ये त्यांना संतपद बहाल करण्यात आले.

संत गोन्सालो गार्सियांची कथा विलक्षण आहे. त्यांची धार्मिक प्रवृत्ती, समुद्रप्रवासाची ओढ आणि यशस्वी व्यापार सोपाऱ्याच्या सांस्कृतिक परंपरेशी नाते सांगतात. सोपाऱ्याच्या मातीने बौद्ध, हिंदू आणि जैनांबरोबरच नव्याने आलेल्या ख्रिस्ती धर्मालाही आपलेसे केले. एका सामाजिक संश्लेषणाची सुरुवात झाली. यातूनच एका ‘ईस्ट इंडियन ख्रिस्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या समाजाचा उदय झाला. पारंपरिक भारतीय समाजाची अनेक वैशिष्ट्ये घेऊन हा समाज आजही आपली सांस्कृतिक समृद्धी जपतो आहे!