Join us  

वसंत मोरेंची ठाकरे गटात घरवापसी; पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले, “भविष्यात पुणे शहरात...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 3:04 PM

Vasant More Joins Thackeray Group: माझ्यासोबत १७ शाखाध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, एक शहराध्यक्ष, दोन सचिव, महिला आघाडीच्या ५ शाखाध्यक्ष यांसह शिवसेनेत स्वगृही परतत आहेत, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

Vasant More Joins Thackeray Group: मनसेतून पुणे मतदारसंघासाठी लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, यासाठी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढलेले तसेच या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले वसंत मोरे यांनी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच प्रवेश केला. अलीकडेच वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. मुंबईत मातोश्रीवर येऊन वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. यावेळी खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

मातोश्रीवर ठाकरे गटात सामील झाल्यावर वसंत मोरे यांनी मीडियाशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. मनोगत व्यक्त करताना वसंत मोरे म्हणाले की, सर्वप्रथम आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आयुष्यात १९९२ मध्ये कात्रज परिसरात पहिल्यांदा शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो. १६ वर्षांचा असताना कात्रज येथे शिवसेनेची शाखा स्थापन झाली, परंतु, वयाची १८ वर्षे पूर्ण होत नसल्यामुळे शाखा प्रमुख होता येत नव्हते. १९९२ मध्ये १२ वी पास झालो आणि पहिला शाखा प्रमुख झालो. तेव्हापासून वयाच्या ३१ व्या वर्षापर्यंत उपविभाग प्रमुखापर्यंत गेलो. त्यानंतर मनसे पक्षात प्रवेश केला. अनेक जण म्हणतात की, तात्यांचा शिवसेनेत प्रवेश आहे. परंतु, हा माझा प्रवेश नाही, तर मी परत एकदा शिवसेनेत आलो आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.

प्रशासनासोबत माझे अतिशय चांगले काम

पुणे शहराचे दोन्ही शाखाध्यक्ष माझ्यासोबत आहेत. गेली १५ वर्ष सातत्याने महानगरपालिकेत शहराचा विरोधी पक्षनेता होतो. प्रशासनासोबत माझे अतिशय चांगले काम आहे. या १० नगरसेवकांचे भविष्यात २५ पेक्षा जास्त नगरसेवक पुणे महापालिकेत येतील आणि यासाठी सर्वजण ताकद उभी करू. तेवढे सांगतो आणि पुन्हा एकदा शिवसेनेत बोलावले, याबद्दल धन्यवाद देतो. माझ्यासोबत १७ शाखाध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, एक शहराध्यक्ष, दोन सचिव, महिला आघाडीच्या ५ शाखाध्यक्ष शिवसेनेत परतत आहे. १२ मार्च रोजी मनसेचा राजीनामा दिला, त्याच दिवशी या सर्वांनीही दिला. आम्ही सर्व स्वगृही परतलो आहोत, असे वसंत मोरे म्हणाले. 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून तात्या लोकसभा लढले, आता पुढे काय करणार, अशी चर्चा सुरू होती. परंतु, तात्यांची शेवटचे डेस्टिनेशन मातोश्रीच असणार, याची मला खात्री होती. तात्यांची सुरुवात शिवसेनेपासून झालेली आहे. तात्या अधेमधे कुठेही गेले असले तरी तात्या हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसैनिक म्हणून शेवटी मातोश्रीच्या मंदिरात दाखल झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरेंना आशीर्वाद दिलेले आहेत. शिवसेना परिवारात ते सामील झालेले आहेत. तात्या शिवसेनेत आल्यामुळे नक्कीच पुणे आणि परिसरात ताकद वाढणार आहे. उद्धव ठाकरेंना मजबूत शिवसैनिक मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

टॅग्स :वसंत मोरेउद्धव ठाकरेसंजय राऊतशिवसेनामुंबई