बोरीवली येथे २६ एप्रिलपासून वसंत व्याख्यानमाला
By मनोहर कुंभेजकर | Published: April 18, 2023 02:12 PM2023-04-18T14:12:36+5:302023-04-18T14:13:11+5:30
डॉ. गणेश चंदनशिवे यांना 'शारदा' तर राकेश वायंगणकर यांना 'जय महाराष्ट्र नगर भूषण' पुरस्कार
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, जीवनगौरव पुरस्कार सन्मानित विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४० वर्षांपासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सुरु असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे. यंदाची जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला बुधवार, २६ एप्रिल २०२३ पासून सुरु होत असून रविवार, ३० एप्रिल २०२३ पर्यंत चालणार आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत 'शारदा पुरस्कार' आणि 'जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार' देण्यात येणार असून लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांना 'शारदा पुरस्कार' तर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणारे राकेश वायंगणकर याना 'जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. नाटककार विद्याधर गोखले, महाराष्ट्र शाहीर साबळे, पंडित कुमार गंधर्व, नाटककार वसंत कानेटकर, पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी 'स्मरण रंजन' या विशेष सांगितिक कार्यक्रमाने जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बुधवार, २६ एप्रिल २०२३ रोजी गुंफण्यात येणार आहे.
सुप्रसिद्ध गायक श्रीरंग भावे, निवेदन श्रेयसी मंत्रवादी, संगीत संयोजन प्रशांत ललित, गायिका केतकी भावे जोशी, ध्वनी संयोजन रवींद्र माळवदे हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. देशासमोर असलेल्या ज्वलंत समस्यांना हात घालणारे दुसरे पुष्प गुरुवार, २७ एप्रिल २०२३ रोजी गुंफण्यात येणार आहे.
'नोकरी मिळवा, बेकारी संपवा' या विषयावर समूपदेशन ज्येष्ठ समूपदेशक प्रा. सुहास पाटील हे करणार आहेत. शिवसेना आमदार विलास पोतनीस आणि शिवसेना विभागप्रमुख उदेश पाटेकर हे यावेळी आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारतीय सैन्य दलातील निवृत्त जवान, शौर्य पदक सन्मानित मधुसूदन सुर्वे यांची शौर्यगाथा वसंत व्याख्यानमालेत तिसऱ्या पुष्पाद्वारे शुक्रवार, २८ एप्रिल २०२३ रोजी डॉ. सौ. सुचिता पाटील या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार आहेत. यावेळी एक विशेष चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मराठी नाटकांच्या सुवर्ण काळातील एक धावती सफर शनिवार, २९ एप्रिल २०२३ रोजी वसंत व्याख्यानमालेत चौथ्या पुष्पाद्वारे अनुभवायला मिळणार आहे. जुनी नाटके, कलावंत, अभिनय, लेखन, आठवणी आणि त्यावर खुसखुशीत शैलीत विवेचन चंद्रशेखर ठाकूर हे करणार आहेत.
या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा समारोप रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी जगातील विविध वाद्यांचा संग्रह करण्याचा छंद जोपासणारे वाद्यप्रेमी मधुर पडवळ यांच्या समवेत कर्णमधुर वाद्यगप्पांनी होणार आहे. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे रोज सायंकाळी ७.३० वाजतां ही वसंत व्याख्यानमाला विनामूल्य होणार असून जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक विजय वैद्य आणि प्रा. सौ. नयना रेगे यांनी केले आहे.