वसईत भरवस्तीत दुकान फोडले
By admin | Published: July 1, 2014 11:53 PM2014-07-01T23:53:58+5:302014-07-01T23:53:58+5:30
वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोड्यांनी पोलीसही हैराण झाले आहेत. आधीच्या गुन्ह्याचा तपास अजूनही सुरूच आहे.
नायगाव : वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोड्यांनी पोलीसही हैराण झाले आहेत. आधीच्या गुन्ह्याचा तपास अजूनही सुरूच आहे. त्यात आरोपी वा अन्य माहिती मिळविण्यात तपास अधिकारी अपयशी ठरले असतानाच अन्य नव्या गुन्ह्यांची भर पडत चालली आहे. एका कर्मचाऱ्यांकडे या स्वरूपाच्या गुन्ह्याची यादीच नसल्याने तपास लागणार तरी कसा? असा नागरिकांचा सवाल आहे.
वसईतील भर वस्तीतील जनरल स्टोअर्स फोडून त्यातील सामान चोरी करण्यात आले. रामसिंह पुरोहित (५२) असे दुकान मालकाचे नाव आहे. त्यांचे सेंटपिटर चर्चनजीक फातिमा बिल्डिंगमध्ये महादेव किराणा स्टोअर्स आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास या भर वस्तीत शटर्स फोडून आतील सिगारेट्स व एअरटेल, वोडाफोन कंपनीचे २० हजार रू. चे व्हावचर्स असा तब्बल १ लाख, ५१ हजार, १८० रू. चा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
या प्रकाराने परिसरातील व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. वारंवार या स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ होत असताना पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही. वसईत आतापर्यंत अशा १० ते १५ गुन्ह्यांचा तपास सुरूच आहे. घटनेची नोंद वसई पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो. हवा. आर. डी. पाटील करीत आहेत. (वार्ताहर)