Join us

मुहूर्त... दिवंगत आनंद दिघेंची जयंती, वाशीचं मार्केट अन् शिंदे सरकारकडून आरक्षणाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 12:35 PM

जरांगे यांनी २६ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली होती.

मराठा आरक्षणाची लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ते एसईबीसी प्रवर्गातून देण्यात आलेलं आरक्षण टिकंल नाही. त्यानंतर, पुन्हा एकदा आरक्षणाची लढाई सुरू झाली आणि मनोज जरागेंच्या नेतृत्त्वात या लढ्याला विस्तीर्ण स्वरुप प्राप्त झालं. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला. राज्यभरातील मराठा बांधवांची या मोर्चाला साथ मिळाली आणि नवी मुंबईतील वाशीत हा मोर्चा थांबला. तेथून सरकार आणि मराठा बांधव यांच्यातील अंतिम चर्चेला सुरुवात झाली. 

जरांगे यांनी २६ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, त्यांचा नियोजित प्रवास सुरू होता. मात्र, नवी मुंबईत त्यांचा मोर्चा पोहोचल्यानंतर शासनाने घाईघाईने त्यांच्याशी चर्चा आणि प्रशासकीय बैठकांचा धडाका लावला. जरांगे यांच्या मागण्यानुसार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढण्याच्याही हालचाली सुरू झाल्या. दरम्यान, जरांगे यांनी मुंबईतील वाशीत थांबण्याची घोषणा केली. आज दुपारी १२ नंतर आपण मुंबईकडे रवाना होऊ, असे जरांगे यांनी जाहीर केल होते. मात्र, शासनाने पहाटेच जरांगेंच्या मागणीनुसार अध्यादेश काढत २७ जानेवारी २०२४ चा मुहूर्त साधला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुवर्य दिवंगत आनंद दिघे यांचा जयंतीदिवस म्हणजे २७ जानेवारी. २७ जानेवारी १९५२ मध्ये आनंद दिघेंचा जन्म झाला होता. त्यामुळे, आजच्या दिवसाचा मुहूर्त साधत शिंदे सरकारने मराठा आरक्षणासाठीचा अध्यादेश काढला. तर, स्वत: मुख्यमंत्री शिंदे वाशी येथे जाऊन त्यांनी मनोज जरांगेंचं उपोषण सोडलं. त्यानंतर, दिवंगत आनंद दिघेंच्या जंयतीचा मुहूर्त साधत आणि मराठा आरक्षणासाठी शेटवच्या श्वासापर्यंत लढाई लढणारे आणि माथाडी कामगारांचा लढा उभारणारे दिवंगत नेते अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीत म्हणजेच वाशीतील बाजार समिती मार्केटमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा हा जीआर मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी, आपल्या भाषणातीह मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांचा उल्लेख केला आहे. 

मी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे, मला आपल्या सर्वांच्या कष्टाची आणि परिस्थितीची जाणीव आहे. म्हणूनच मी छत्रपती शिवाजी महारांजांच्या पुतळ्याला साक्ष मानून शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करत आहे, दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आज माझे गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांची जयंती आहे, तर २३ जानेवारील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आपण साजरी केली. माझ्या आयुष्यातील या दोन्ही गुरुवर्यांचे आशीर्वाद आणि सकल मराठा समाज बांधवांचे आशीर्वादही माझ्या पाठीशी आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटले. तसेच, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीत हा ऐतिहासिक सोहळा साजरा होत आहे, असे म्हणत त्यांच्या बलिदानाची आठवण मुख्यमंत्र्यांनी काढली.

आनंद दिघेंच्या नेतृत्वात शिंदेंची वाटचाल 

आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ मध्ये झाला. ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात त्यांचं घर होतं. त्यांच्या घरी आई, वडील, बहीणी आणि भाऊ असा परिवार होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने आनंद दिघे प्रभावित झाले. त्यामुळे, १९८० च्या दशकांत ठाणे हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनला होता. तिथे शिवसेनेचा भगवा फडकवून लोकांसाठी काम करायला आनंद दिघे यांनी सुरूवात केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंचं नेतृत्त्व हे आनंद दिघेंच्या नेतृत्त्वातच घडलं. ठाण्यात रिक्षाचालक म्हणून काम केलेल्या एकनाथ शिंदेंनी दिघेंच्या नेतृत्त्वातच आपली राजकीय कारकिर्द महापालिकेच्या नगरसेवकापासून सुरू केली होती. तर, शिवसेना शाखाप्रमुख पदापासून ते शिवसेना मुख्य नेता पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळेच, त्यांच्या आयुष्यात आनंद दिघेंचं स्थान गुरुस्थानी असून ते आनंद दिघेंचं नाव घेऊनच आपल्या भाषणाची सुरुवात करतात. टेंभी नाक्याच्या शाखेत आजही आनंद दिघे यांची खुर्ची तशीच ठेवली आहे. एकनाथ शिंदे जेव्हाही या शाखेत येतात, त्यावेळी ते बाजूच्या खुर्चीत बसतात.

टॅग्स :मराठा आरक्षणएकनाथ शिंदेमनोज जरांगे-पाटीलशिवसेना