Join us

वासुदेव करणार निवडणुकीची जनजागृती

By admin | Published: January 24, 2017 6:13 AM

‘वासुदेव आला हो वासुदेव आला’, ‘भोलेनाथ..’ डोळे उघडायच्या आत भल्या पहाटे येणारा वासुदेव आणि नंदीबैल अनेकांच्या लक्षात असेल

मुंबई : ‘वासुदेव आला हो वासुदेव आला’, ‘भोलेनाथ..’ डोळे उघडायच्या आत भल्या पहाटे येणारा वासुदेव आणि नंदीबैल अनेकांच्या लक्षात असेल. या पारंपरिक पद्धतीचा अवलंब मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी केला जाणार आहे. १ फेब्रुवारीपासून मुंबई आणि उपनगरातील विविध प्रभागांत वासुदेव आणि नंदीबैल पाहायला मिळणार असून, याची जोरदार तयारी महापालिकेकडून करण्यात येत आहे.महापालिकेच्या निवडणुकांना जेमतेम महिना उरला आहे. उमेदवारांची मतासाठी चढाओढ सुरू आहेच, परंतु मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिकेने शक्कल लढवत, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वासुदेवाच्या माध्यमातून प्रचार करण्याचे योजिले आहे. त्या संदर्भातील जोरदार तयारी सुरू असल्याचे माजी विभाग निरीक्षक सत्यवान मेस्त्री यांनी सांगितले. सध्या ठिकठिकाणी वासुदेवाचा वेश करून फिरणारे पारंपरिक कलाकार आणि नंदीबैल घेऊन फिरणारे यांना एकत्र करण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी गाणी, संवाद याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या गटात ८१ वर्षीय वासुदेव भीवा काकडे यांचा समावेशसुद्धा असल्याची माहिती मेस्त्री यांनी दिली. १ फेब्रुवारीपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, मुंबई आणि उपनगरातील लहान-लहान विभागांत, महाविद्यालयांत, विद्यापीठात जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही मेस्त्री यांनी सांगितले. (प्रतिनिधी)