मुंबई : वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले. निर्बंधांमुळे बाजारहाटाच्या वेळा पाळत महिलावर्गाने मोठ्या उत्साहात वटपौर्णिमेची खरेदी केली. अख्ख्या फणसांसह, फणसाचे सुटे गरे; बदामी, केशर, रायवळ असे आंब्यांचे प्रकार, करवंदे, जांभळे आदी वटपौर्णिमेच्या वाणासाठी लागणाऱ्या फळांनी बाजार फुलून गेला होता.
पर्यावरण रक्षणाविषयी कितीही जागृती झाली तरी बाजारात वडाच्या झाडाच्या फांद्या, वडाची सुटी पानेही विक्रीसाठी मांडलेली दिसून येत होती. वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या महिला या पानांची खरेदी करताना दिसून येत होत्या. त्यासोबतच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी लागणाऱ्या दोऱ्यांची बंडलेही मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ठेवलेली होती. फणसाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने ग्राहकांना फणस बऱ्यापैकी उपलब्ध झाला. वटपौर्णिमेच्या उपवासासाठी लागणारी रताळी घेण्यासाठीही महिलांची झुंबड उडाली होती. त्याचप्रमाणे, पूजेसाठी विविध प्रकारची फुले खरेदी करण्यासाठीही महिलांची लगबग उडालेली दिसून येत होती.