मुंबई : वीकेण्डला पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उपनगरीय लोकलचा वेग मंदावला. मध्य रेल्वे मार्गावरील ४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल उशिराने चालविण्यात येत होत्या. पावसाचा फटका मेल, एक्स्प्रेसला बसला.
पाऊस पडत असल्याने वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढले आहे. दृश्यमानता कमी झाल्याने मोटरमनला लोकलचा वेग कमी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, लोकलचा वेग कमी करून लोकल चालविण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण, कसारा, कर्जत; हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरार लोकल उशिराने चालविण्यात येत होत्या.
शुक्रवारी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. मात्र शनिवारी लोकलचा वेग मंदावल्याने लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने पोहोचत होती.