वीकेण्डला पावसाची जोरदार बॅटिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:32 AM2018-06-25T02:32:22+5:302018-06-25T02:32:28+5:30
आठवडाभर ‘दांडी’ मारणाऱ्या पावसाने शनिवारी सकाळपासून मुंबापुरीत हजेरी लावली.
मुंबई : आठवडाभर ‘दांडी’ मारणाऱ्या पावसाने शनिवारी सकाळपासून मुंबापुरीत हजेरी लावली. रविवारीही शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबईकरांची काहीशी तारांबळ उडाली. मात्र ‘वीकेण्ड’ एन्जॉय करण्यासाठी निघालेल्या मंडळींनी या पावसाचा मनमुराद आनंद लुटला.
सकाळपासून मुंबई शहराच्या दादर, कुलाबा, भायखळा, करी रोड, लोअर परळ, वरळी परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत. तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक असल्याने काही चाकरमान्यांना रेल्वेच्या मंदगतीला सामोरे जावे लागले. दुपारी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग सुरू केली.
सातत्याने पडणाºया पावसाने थंडगार वातावरण अनुभवायला मिळत आहे. प्रामुख्याने तरुणवर्गाने याचा मनमुराद आनंद लुटला. मोटारसायकलवरून पावसात भिजत, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत जल्लोष केला. शहर-उपनगरातल्या अनेक समुद्रकिनाºयांवर लोकांची गर्दी पाहायला मिळाली. सायंकाळनंतर पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.
पूर्व उपनगरात दमदार
रविवारी पहाटेपासून पावसाने पूर्व उपनगराला झोडपून काढले. मुलुंड, भांडुप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी या भागात जोरदार पाऊस पडला. पूर्व उपनगरात एकूण ७२.०४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. वीकेण्डच्या दिवशी जोरदार पाऊस असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडून पावसाचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर आणि इतर रस्त्यांवर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. २९ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
पूर्व उपनगरात कांजूरमधील छत्रपतीनगर, साईनगर, शिवकृपानगर, रामनगर या भागात रविवारच्या पावसाने पाणी साचले आहे. शिवकृपानगर येथे गेल्या वर्षी पावसामध्ये साचलेल्या पाण्यात दोन मुलांचा बळी गेला. असे असतानादेखील यावर पालिकेकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. झोपड्या वाढल्याने या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नाही. त्यामुळे थोड्या पावसानेदेखील पाणी साचते, असे रहिवाशांनी सांगितले. कुर्ला येथे बस डेपोच्या परिसरात पाणी साचले. रेल्वे स्थानक परिसर, भुयारी मार्ग, पाइप रोड, लालबहाद्दूर शास्त्री रोड येथेदेखील पाऊस पडल्याने पाणी साचल्याचे दिसून आले. मुलुंडमधील रस्त्यांवरही पाणी साचले होते.
रविवारी मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक आणि त्यात पाऊस असल्याने प्रवाशांची बरीच तारांबळ उडाली. मात्र, या मुसळधार पावसात मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. हार्बर मार्गावरील प्रवाशांना मात्र पावसाचा आणि ब्लॉकचा त्रास झाला. रविवारी पवईमध्ये ७७.८० मिमी, मुलुंड पूर्व भागात ७६.०० मिमी, मुलुंड पश्चिम भागात ४२.८० मिमी, चेंबूरमध्ये ३४.६०, भांडुप ६८.८० आणि घाटकोपर मध्ये १६.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नॅशनल पार्कात गर्दी
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पावसामुळे पर्यटकांची गर्दी दिसून आली. उद्यानातील झरे, ओढे, नदी तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पर्यटकांनी पावसात मनसोक्त भिजून ‘वीकेण्ड’ उत्साहात साजरा केला.
वाहतूककोंडी : पश्चिम द्रुतगती महामार्गावर पावसाने चांगलेच झोडपल्यामुळे वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडीत आणखीनच भर पडली. तसेच एस.व्ही. रोडवरही काही भागात पाणी साचल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती.
पश्चिम रेल्वेवरही परिणाम
जोरदार पावसामुळे रविवारी पश्चिम रेल्वेवरही परिणाम जाणवून आला. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते गोरेगाव दरम्यान घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे बोरीवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव येथील प्रवाशांना लोकलमध्ये गर्दी दिसून आली.
पश्चिम उपनगरात शनिवारपासून पडत असलेल्या संततधार पावसाचा जोर रविवारी दुपारनंतर वाढला. दहिसर ते वांद्रे येथे रविवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली.
दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, खार रोड आणि वांद्रे येथे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बºयाच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पश्चिम रेल्वेही पावसामुळे धिम्यागतीने
धावत होती.
वांद्रे पश्चिमेकडे ५१.२० मिमी, मालाड पश्चिम ५४.६० मिमी, बोरीवली पूर्वेकडे २२.८० मिमी, अंधेरी पूर्वेकडे २९.६० मिमी, कांदिवली पूर्वेकडील आकुर्ली रोड २५.०० मिमी, गोरेगाव २८.००, कांदिवली पश्चिमेकडे ११.०० मिमी, चारकोप
सेक्टर १ २२.६० आणि कांदिवली पूर्वेकडे १.८०
इतका पाऊस पडला.
एस.व्ही. रोड येथेही पाणी तुंबल्याने वाहतूककोंडी झाली. कांदिवली पश्चिमेकडील चारकोपमधील सेक्टर एक, तीन आणि सहा या भागातही जोरदार पाऊस पडला. गोरेगाव पश्चिमेकडील म. गांधी रोड, बांगुर नगर, मोतीलाल नगर, हनुमान नगर, तीन डोंगरी, भगत सिंग नगर - एक आणि दोन या ठिकाणी चांगला पाऊस पडला.