- शेफाली परब-पंडित मुंबई : मोदी लाटेतही ‘हाता’ला बळ देणाऱ्या वडाळा विधानसभा मतदारसंघात गेल्या आठवड्यात राजकीय उलथापालथ झाली. सात वेळा निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला हादरा बसलाच; पण शिवसेनेच्या गोटातही प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. कोळंबकरांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस तयारीला लागली आहे. तर शिवसेनेतील इच्छुकांनी मतदारसंघावर आपली पकड आणखी घट करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे वडाळा विधानसभेत राजकीय हालचालींना वेग आला आहे.दक्षिण मध्य मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी एक असलेल्या वडाळा मतदारसंघावर पूर्वी शिवसेनेचेच वर्चस्व होते. निष्ठावान शिवसैनिक अशी ओळख असलेले कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या तिकिटावर पाच वेळा आमदारपदी निवडून आले. मात्र माजी मंत्री नारायण राणे यांच्या बरोबरीने कोळंबकरांनी २००५ मध्ये शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यानंतर दोन वेळा काँग्रेसमधून ते निवडून आले. २०१४मधील विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही भाजपच्या मिहिर कोटेचा यांना त्यांनी पराभूत केले.२०१७मध्ये राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडला, पण या वेळेस कोळंबकर पक्षातच राहिले. गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांची जवळीक वाढली होती आणि गेल्याच आठवड्यात कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपतून वडाळा मतदारसंघावर त्यांचा दावा राहील. परंतु, पूर्वीपासूनचा हा मतदारसंघ परत मिळविण्यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. माजी महापौर व शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे दक्षिण मुंबईतून निवडून आले. त्यामुळे भाजपबरोबर युती झाली तरी या जागेवर पाणी सोडण्यासाठी शिवसेना सहजासहजी तयार होणार नाही. तर हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राहावा, यासाठी काँग्रेस ही लढत प्रतिष्ठेची करण्याची शक्यता आहे. माजी खासदार व काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचाही येथे जोर आहे. तसेच काँग्रेसमधून सुनील मोरे, राजू वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत.२००९ मध्ये विधान सभा निवडणुकीत कालिदास कोळंबकर हे ३० हजार मताधिक्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. तर २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही ते ८०० मतांच्या फरकाने निवडून आले होते. तर यापूर्वी पाच वेळा ते शिवसेनेतून आमदारपदी निवडून आले आहेत.वडाळा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आहे. मात्र युती झाल्यास भाजपातून कोळंबकर हक्क सांगण्याची शक्यता आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार येथे दुसºया क्रमांकावर होता. त्यामुळे ही जागा युतीसाठी अडचणीची ठरेल. या मतदारसंघात शिवसेनेचे चार तर काँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत.काँग्रेस अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती झाल्यामुळे काँग्रेससाठी ही जागा प्रतिष्ठेची ठरणार आहे. गायकवाड यांनी दक्षिण मुंबईचे खासदारपदही यापूर्वी भूषविल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी अधिक आहे. माजी नगरसेवक सुनील मोरे यांनी पक्षांतर केल्यास काँग्रेसला या मतदारसंघासाठी अन्य पर्याय शोधावा लागेल.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना ३३ हजार ९१८ तर शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना ७३ हजार ४१५ मते मिळाली होती.
वेध विधानसभेचा: कोळंबकरांच्या सोडचिठ्ठीने वडाळ्यात काँग्रेसला हादरा; तर शिवसेनेत अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 1:16 AM