मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतले. याशिवाय स्वातंत्रवीर सावरकर स्मारक येथे जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांनाही अभिवादन केले. यानंतर आता सावरकरांचे वारसदार असलेले रणजित सावरकर (Ranjeet Savarkar) यांना आमदारकी मिळण्याची शक्यता असून, त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता नव्याने निर्णय घेतले जात आहे. गेल्या दीड वर्षांपासून रखडेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आता नव्या सरकारमध्ये निकाली निकाली निघण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी भाजप सावरकरांच्या वारसाचा मोठी संधी देण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारस रणजित सावरकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील नेत्यांची रणजित सावरकर यांच्या नावाला पसंती
मविआ सरकारने पाठवले राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आता नव्याने तयार केली जात आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रणजीत सावरकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. संघ आणि दिल्लीतील नेत्यांची रणजित सावरकर यांच्या नावाला पसंती दिली आहे. रणजित सावरकर यांना संधी देऊन हिंदुत्व अधिक बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी देखील या नावाला सहमती देतील, अशी सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारकडून १२ जणांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली होती. मात्र, अद्याप यावर निर्णय झालेला नाही.
कोण आहेत रणजित सावरकर?
रणजित सावरकर हे व्यवसायाने इंजिनियर आहेत. सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक प्रबंधक म्हणून काम केले. आपद व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी यांच्यात थेट व्हिडीओ संपर्क व्हावा यासाठी स्थापन केलेल्या उपग्रह संपर्क यंत्रणेच्या संरचनेत त्यांचा मोलाच्या सहभाग होता. रणजित सावरकर यांनी 'सावरकर स्मारक डॉट कॉम' या संकेतस्थळाची निर्मिती केली. त्यावर सावरकरांचे मराठी आणि इंग्रजी साहित्य निःशुल्क उपलब्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी १२ भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलेले सावरकर साहित्य स्मारकाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. आता ब्रेल लिपीतही सावरकर साहित्य उपलब्ध आहे.