महापालिकेचे वीर सावरकर उद्यान मोजतेय शेवटची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 01:37 AM2020-02-18T01:37:51+5:302020-02-18T01:38:06+5:30
विलेपार्लेतील स्थिती: विजेचे दिवे बंद, अस्वच्छतेसह प्रेमीयुगुलांचा उच्छाद
मुंबई : विलेपार्ले पूर्वेकडील महात्मा गांधी रस्त्यावरील सनसिटी सिनेमागृहाच्या समोर असलेल्या महापालिकेचे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान शेवटची घटका मोजू लागले आहे. उद्यानातील विजेचे दिवे बंद, अस्वच्छता, प्रेमीयुगुलांचा उच्छाद, मद्यपींचा अड्डा इत्यादी समस्यांमुळे उद्यानाची दुरवस्था झाली आहे. तसेच स्थानिकांना रात्रीच्या वेळी उद्यानात येणे धोकादायक झाले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्याच नावाने असलेले उद्यान हे शेवटची घटका मोजत असेल, तर ती लज्जास्पद बाब असल्याचे पार्लेकरांनी सांगितले.
पालिकेच्या कंत्राटदारांच्या कामचुकारपणामुळे उद्यानाची दयनीय अवस्था झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच महापालिकेने त्वरित संपूर्ण उद्यानाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याची मागणीही मनसेकडून केली जात आहे. माजी नगरसेवक सदाशिव पालांडे हे नगरसेवक पदावर कार्यरत असल्यापासून या ठिकाणी उद्यान अस्तित्वात आहे. परंतु सध्या उद्यानाकडे पालिकेचे दुर्लक्ष झालेले दिसून येते. उद्यानाच्या परिसरात दोन कॉलेज असून इथे शिकणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी दिवसभर उद्यानात ठाण मांडून बसलेले असतात. तसेच यातील काही प्रेमीयुगुल अश्लील चाळे करतात, असे स्थानिक रहिवासी गोविंद शिरगावकर यांनी सांगितले.
उद्यानाची शोभा वाढविण्यासाठी कारंजे असून ते बंद अवस्थेत आहेत. तसेच उद्यानात अस्वच्छता पसरलेली असते. उद्यानात बसविण्यात आलेले १३ विजेचे दिवे हे आॅक्टोबर २०१९ पासून बंद होते. परंतु महापालिकेकडे मनसेने पाठपुरावा करून दिवे दुरुस्ती करून घेतले. उद्यानाच्या परिसरात साडेसहा फूट उंचीचे ८ ते १० दिवे असून ते बंद अवस्थेत आहेत.
उद्यानाची सुरक्षा रामभरोसे असून नागरिकांनी तक्रार केल्यानंतर सोमवारपासून एक सुरक्षारक्षक सेवेसाठी रुजू झाला आहे. काही वर्षांपूर्वी उद्यानात मोबाइल टॉवर बसविण्यात आला होता. परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे टॉवर बंद करण्यात आला. याशिवाय उद्यानात स्वच्छ पार्ले अभियानांतर्गत खत प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतु खत प्रकल्प हा दिलेल्या जागी न करता उद्यानाच्या मध्यभागी केला जातो. त्यामुळे उद्यानाच्या परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशी माहिती मनसे शाखा अध्यक्ष समीर काळे यांनी दिली.
असा होणार उद्यानाचा कायापालट
संपूर्ण उद्यानाची रंगरंगोटी, कारंज्यामध्ये रंगीत रोशणाई व संथ संगीत बसविले जाणार आहे. वृद्ध व अपंग, अंध नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. अंध मुलांना उद्यानाची ओळख निर्माण व्हावी यासाठी मुलांसाठी विशेष स्पंदन स्पर्श बसविण्याचा संकल्प आहे. उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरेही लावले जाणार आहेत. मात्र सध्याची स्थिती दयनिय आहे.