मुंबई - सोशल मीडियावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आज कंदिवलीत ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. कांदिवली पूर्व येथील भाजपा कार्यालयासमोर नितीन राऊत यांच्याविरुद्ध ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राऊत यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला.
भाजपाच्या दणक्याने नरमलेल्या राऊत यांनी ही पोस्ट डीलीट केली, परंतू माफीशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा भातखळकर यांनी दिला असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी राऊत यांच्याविरुद्ध एफआय़आर दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या फेसबुकवर बुधवारी टाकण्यात आलेल्या बदनामीकारक पोस्टमुळे सावरकर भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून हे प्रकार वाढले असून हिंदुत्ववाद्यांच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य करण्याचे प्रकार वारंवार होतायत. सावरकरांची बदनामी केल्यामुळे आमदार भातखळकर यांनी ‘जोडे मारा’ आंदोलनाची हाक दिली.
मीडियापर्यंत हा विषय पोहोचल्यानंतर नितीन राऊत यांच्या कार्यालयातून भातखळकर यांना फोन आला. आम्ही ही पोस्ट डिलीट करीत असल्याचे सांगितले. परंतु, फेसबुकवर टाकण्यात आलेली पोस्ट ही केवळ आक्षेपार्ह नसून सावरकरांची बदनामी करणारी आहे, त्यामुळे राऊत यांनी माफी मागितल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे भातखळकर यांनी स्पष्ट केले.
मंत्री राऊत यांनी याप्रकरणी तात्काळ माफी न मागितल्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याविरुद्ध एफआय़आर दाखल करावा अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’तून यापूर्वी सावरकरांवर चिखलफेक करण्यात आली तेव्हाही शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री हातावर हात ठेवून बसले होते. आता तरी त्यांनी कारवाईची हिंमत दाखवावी असे आव्हान भातखळकर यांनी दिले आहे.