मुंबई - देशासाठी लढताना २०१७ साली वीरगती प्राप्त झालेल्या सहा भारतीय जवानांच्या पत्नींचा आणि एका वीरमातेचा गौरव स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून षण्मुखानंद सभागृहात केला जाणार आहे. या वेळी त्यांना दोन लाख रुपयांचा धनादेश, तसेच प्रत्येकी ५० हजारांपर्यंत वैयक्तिक स्वरूपाची भेट प्रदान केली जाणार आहे. षण्मुखानंद सभा आणि भारतीय सेनेच्या जनरल आॅफिसर कमांडिंग (महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर यांनी सांगितले की, षण्मुखानंद सभा भारतीय सेनेच्या गौरवार्थ अशा प्रकारे नेहमीच पुढाकार घेत असते. यंदा ७२ विद्यार्थी या सोहळ्यात मूळ पाच कडव्यांचे संपूर्ण राष्ट्रगीत सादर करणार आहेत.वंडर वुमनचाही होणार सन्मानभारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला विंग कमांडो ट्रेनर तथा वंडर वुमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. सीमा राव यांना या सोहळ्यात श्री षण्मुख शौर्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सुवर्णपदक, सुवर्णवर्खाची समई आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. सीमा राव यांनी एनएसजी, ब्लॅक कॅट, एअरफोर्स गार्ड, आयटीबीपी, एमएआरक्यू यांसह भारतीय सेनेच्या १५ हजारांहून अधिक जवानांना प्रशिक्षण दिले आहे.तसेच १५ राज्यांमधील शहर पोलीस दलात कोणताही मोबदला न घेता त्या गेल्या २० वर्षांपासून प्रशिक्षण देत आहेत. अगदी नजीकच्या युद्धातल्या चकमकीतल्या आणि हातघाईच्या विशिष्ट डावपेचांच्या त्या आद्य प्रवर्तक असून, मिलिटरी मार्शल आर्टमध्ये त्या सातव्या पातळीच्या ब्लॅक बेल्ट मानकरी आहेत. याशिवाय ब्रूस लीच्या ‘जीत कून दो’च्या मार्शल आर्ट प्रकारात जगातील फार थोड्या अधिकृत प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना होते.
वीरमाता, वीरपत्नींचा गौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 4:27 AM