मुंबई : माटुंग्याच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधील (व्हीजेटीआय) ७७ टक्के विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये देशी-विदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर्स मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. यात मिळालेले सर्वात मोठे पॅकेज वार्षिक ५७ लाख रुपयांचे आहे.
जगभर रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. अशा परिस्थितीतही व्हीजेटीआयच्या प्लेसमेंट सीझनमध्ये आयटी, सॉफ्टवेअर उद्योगच नोकऱ्या देण्यात आघाडीवर राहिले आहे. व्हीजेटीआयमध्ये दिल्या गेलेल्या ऑफर्सपैकी ३३ टक्के याच क्षेत्रातून आहेत. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ६२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४७८ विद्यार्थ्यांना पदवी हातात मिळत नाही, तोच देशी-विदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर्स आल्या आहेत.
या प्लेसमेंट सीझनमध्ये एकूण २५५ कंपन्यांनी ५३३ नोकरीच्या संधी देऊ केल्या. यापैकी १४ कंपन्या आंतरराष्ट्रीय आहेत. जूनमध्ये पुन्हा एकदा प्लेसमेंटची प्रक्रिया राबविण्यात येईल. यात आणखी डझनभर कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. संस्थेतील ८९ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा वर्तवली आहे. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षातच विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात कामाच्या संधी मिळवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो.
सर्वाधिक मोठे पॅकेज कॉम्प्युटर, आयटीला -
५७ लाखांचे सर्वाधिक मोठे पॅकेज कॉम्प्युटर इंजिनिअरिंमधील विद्यार्थ्याला दिले गेले. त्या खालोखाल ५० लाखांचे पॅकेज एका आयटीच्या विद्यार्थ्याला दिले गेले.
सरासरी पॅकेजमध्येही पुढे-
काॅम्प्युटर आणि आयटी या शाखा सरासरी पॅकेज मिळविण्यातही अग्रेसर आहेत. कॉम्प्युटरसाठी वार्षिक सरासरी १९.५२ लाखांचे, तर आयटीकरिता १८.२९ (सीटीसी) लाखांचे पॅकेज देण्यात आले.