मुंबई : पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर डीसी-एसी परिवर्तन झाल्यामुळे लोकल गाड्यांचा वेग वाढला असतानाच हार्बरला मात्र त्याचा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हार्बर, ट्रान्सहार्बरवरील रुळांच्या वेगाची क्षमता (ट्रॅक स्पीड) ही सध्या ताशी ८0 किमी एवढीच आहे. त्यामुळे परिवर्तन होऊन लोकलचा वेग ताशी १00 किमीपर्यंत वाढू शकत नाही, असे मध्य रेल्वेतील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.हार्बर व ट्रान्सहार्बर मार्गावर डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 अल्टरनेट करंट) परिवर्तनाचे काम शनिवार मध्यरात्र ते रविवार पहाटेच्या दरम्यान पूर्ण करण्यात आले. काम पूर्ण होताच पहाटे ४.४६ वाजता पनवेल ते वाशी पहिली लोकल धावली, तर पावणेसहा वाजता सीएसटी ते वाशी लोकल धावली. एसी परिवर्तन झाल्याने वीजबचत होतानाच लोकलचा वेग ताशी ८0 किमीवरून ताशी १00 पर्यंत पोहोचेल, अशी माहिती देण्यात येत होती. मात्र, वेग वाढणार नसल्याचे मध्य रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कर्जत, कसारा, खोपोली या मार्गावरील ट्रॅकच्या स्पीडची क्षमता ही ताशी १00 किमीपर्यंत आहे. त्यामुळे या मार्गावरील धिम्या आणि जलद लोकलचा वेग डीसी ते एसी परिवर्तनानंतर वाढविण्यात आला आहे, परंतु हार्बरवर तशी परिस्थिती नाही. सध्या हार्बर व ट्रान्सहार्बरवरील धिम्या लोकलचा वेग जास्तीत जास्त ताशी ७0 ते ७५ किमीपर्यंत असतो. ट्रॅक स्पीड क्षमता वाढवल्यावरच लोकलचा वेग वाढू शकतो, अशी माहिती देण्यात आली.
परिवर्तन होऊनही वेगाला ब्रेकच
By admin | Published: April 11, 2016 2:59 AM