भाजीपाल्याची आवक घटली; बाजारभाव वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 05:19 AM2019-08-07T05:19:07+5:302019-08-07T05:19:22+5:30

कोथिंबीरसह फ्लॉवरचे दर झाले दुप्पट

Vegetable arrivals declined | भाजीपाल्याची आवक घटली; बाजारभाव वाढले

भाजीपाल्याची आवक घटली; बाजारभाव वाढले

Next

नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई बाजार समितीमधील भाजीपाल्याची आवक घसरली आहे. होलसेल मार्केटमध्ये तीन दिवसांमध्ये कोथिंबीरसह फ्लॉवरचे दर दुप्पट झाले आहेत. बाजार समितीमध्ये शनिवारी तब्बल ८६ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली होती. आठवड्यामधील सर्वात जास्त आवक या दिवशी झाली होती. श्रावण सुरू असल्याने भाजीपाल्याला मागणी वाढली आहे; परंतु मागणीच्या तुलनेमध्ये आवक होत नसल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत.

सोमवारी ५३ हजार व मंगळवारी ४५ हजार टन आवक झाली आहे. मंगळवारी पाऊस काही प्रमाणात उघडला असल्यामुळे मुंबईमधून खरेदीसाठी किरकोळ व्यापारी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आले होते. माल पुरेसा नसल्यामुळे जादा दराने खरेदी करावी लागली. शनिवारी होलसेल मार्केटमध्ये फ्लॉवर १० ते १४ रुपये किलो दराने विकला जात होता. मंगळवारी हे दर २० ते २८ रुपये किलो एवढे झाले आहेत. कोथिंबीरचे दर प्रतिजुडी १० ते ४० वरून २० ते ८० एवढे झाले आहेत.

भाजी मार्र्केटमधील व्यापारी प्रतिनिधी शंकर पिंगळे यांनी सांगितले की, आवक कमी होत असल्यामुळे काही प्रमाणात दर वाढले आहेत. सध्य गुजरात, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक व इतर ठिकाणावरून भाजीपाला व्रिकीसाठी येत आहे. पावसामुळे पिकांचे किती नुकसान झाले हे आठवड्यामध्ये स्पष्ट होईल. नुकसान जास्त झाले असल्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दुधाचा तुटवडा होणार
पावसामुळे दूध व्यवसायावरही परिणाम झाला. कोल्हापूर जिल्ह्यात दूध संकलन व वाहतूक करण्यास अडथळे निर्माण होत असून त्याचा परिणाम मुंबईवर होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून दूध पुरेसे येणार नसल्याचे सांगितले जात आहे. नवी मुंबईमधील वारणा डेरीचे जनरल मॅनेजर एस. एम. पाटील व सहायक जनरल मॅनेजर सुरेंद्र तासकर यांनी सांगितले की, मुंबईत दीड लाख लीटर दुधाचा पुरवठा आम्ही करत आहोत. गावाकडे मंगळवारी दूधसंकलन होऊ शकलेले नाही. यामुळे बुधवारी दुधाची आवक कमी होणार असल्याचे सांगितले.

Web Title: Vegetable arrivals declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.