Join us

नवी मुंबई, पनवेलवरही भाजीपाल्याचे संकट

By admin | Published: June 03, 2017 6:43 AM

शेतकरी संपामुळे मुंबई व पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार मंदावले आहेत. आवक घटल्याने बाजारभाव गगनाला भिडू

नामदेव मोरे, वैभव गायकर/  लोकमत न्यूज नेटवर्कशेतकरी संपामुळे मुंबई व पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार मंदावले आहेत. आवक घटल्याने बाजारभाव गगनाला भिडू लागल्याने भाजी खरेदीसाठी गृहिणींची धावपळ सुरू झाली होती. शनिवारपासून भाजी मिळण्याची शक्यता नसल्याने मिळेल त्या भावाने खरेदी केली जात असल्याचे चित्र शहरात दिसू लागले होते. अनेक गृहिणींनी स्वस्त भाजीपाला मिळावा यासाठी थेट एपीएमसीच्या होलसेल बाजारपेठेमध्ये व मॅफ्को मार्केटमध्ये गर्दी केली होती. शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीच नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. संपाच्या पहिल्याच दिवशी १ जूनला आवक भरपूर झाली असल्याने बाजारभाव स्थिर होते. यामुळे बहुतांश गृहिणींनी आठ दिवस पुरेल एवढा भाजीपाला खरेदी करून ठेवला होता. शुक्रवारी होलसेल व किरकोळ मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले. अनेक भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. भाजी खरेदीसाठी गेलेल्या गृहिणींनी भाववाढीविषयी विक्रेत्यांकडे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. एका दिवसात एवढे भाव कसे वाढले? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विक्रेतेही मालाचा तुटवडा आहे. आज भाजी भेटत आहे, उद्या आम्हालाच दुकान बंद ठेवावे लागेल. विक्रीसाठीही माल मिळणार नाही. मिळालाच तर त्याचे दर दुप्पट किंवा तिप्पट असतील असे सांगण्यास सुरुवात केली. नवी मुंबईमधील अनेक गृहिणींनी मुंबई बाजार समितीमध्ये जाऊन भाजी खरेदीसाठी जाणे पसंत केले. याशिवाय कांदा मार्केटच्या बाजूला असलेल्या मॅफ्को मार्केटमध्येही भाजी खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी आलेला नसल्याने कामगार हातगाडी व गाळ्यांमध्ये आराम करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. माथाडी नेते शशिकांत शिंदे यांना कोरेगावमध्ये अटक झाली. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी धान्य, मसाला व कांदा मार्केट बंद करण्याचे आवाहन केले. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ७० टक्के मार्केट बंद झाले होते. नियमित रहदारी सुरू असलेल्या बाजारपेठेमध्ये शुकशुकाट असल्याचे जाणवू लागले होते. किरकोळ मार्केटमध्येही अनेक विक्रेत्यांकडील माल दुपारीच संपला होता. शनिवारी एपीएमसीमध्ये किती माल उपलब्ध होतो, यावर किरकोळ मार्केटमधील बाजारभाव अवलंबून राहणार आहेत.विक्रेत्यांकडील माल संपलाकिरकोळ मार्केटमध्ये सायंकाळपर्यंत बहुतांश सर्व कृषी मालाची विक्री झाली होती. शनिवारी एपीएमसी मार्केटमध्ये किती आवक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी पुरेसा माल आला नाही, तर किरकोळ मार्केटमध्ये विक्रीसाठीही माल मिळणार नाही. ज्या व्यापाऱ्यांकडे माल उपलब्ध असेल ते जादा दराने विक्री करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी संपाचा फटका पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीलापनवेल : राज्यभर शेतकरी संपावर गेल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवरदेखील त्याचा परिणाम झाला असून, एक दिवसात सुमारे ५०० क्विंटल मालाची आवक घटल्याची माहिती समोर आली आहे. संप सुरू राहिला तर ही आवक आणखी कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.३१ तारखेपासून सुरू झालेल्या या संपामुळे आवक दिवसेंदिवस कमी होत असून शेतकऱ्यांचे आंदोलन उग्र होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्याचा मोठा फरक पडणार आहे. ३१ मे रोजी एकूण १५ भाजीपाल्याच्या गाड्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत आल्या होत्या, यामध्ये १६०० क्विंटल मालाचा समावेश होता.१ जूनला १६ गाड्यांमार्फत १८०० क्विंटल माल बाजार समितीत दाखल झाला होता. मात्र, शेतकरी आंदोलन पेटले असताना २ जूनला शुक्र वारी त्याचा मोठा परिणाम या ठिकाणी दिसून आला. केवळ १३ गाड्या या ठिकाणी आल्या होत्या. १३०० क्विंटल मालाची आवक त्यांच्यामार्फत झाली असली तरी केवळ एका दिवसात सुमारे ५०० क्विंटलपर्यंत ही आवक घटली. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या गाड्या विविध ठिकाणच्या रस्त्यात थांबलेल्या होत्या. त्यामुळे या गाड्या बाजार समितीवर येऊ शकल्या, मात्र संप मिटला नाही तर ही अवस्था आणखी बिकट होणार आहे. पनवेल कृषी बाजार समितीत गुजरात, उत्तर प्रदेश, सातारा आदींसह वाशी एपीएमसी या ठिकाणाहून माल येत असतो. मालाची आवक घटल्याने बाजारभाव वाढले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघराचा खर्च वाढला आहे.मॅफ्को मार्केटमध्ये गर्दी कांदा मार्केटच्या शेजारी मॅफ्को हे सेमीहोलसेल मार्केट आहे. नवी मुंबईमध्ये सर्वात स्वस्त भाजी याच ठिकाणी उपलब्ध असते. यामुळे शुक्रवारी वाशी, नेरूळ ते कोपरखैरणे मधून ग्राहक मॅफ्को मार्केटमध्ये खरेदीसाठी आले होते. शनिवारी या ठिकाणीही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.डाळी-कडधान्यांना पसंतीभाजीपाल्याचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. संप सुरूच राहिला तर त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिकांनी भाजीपाल्याऐवजी कडधान्यांनाच पसंती देण्यास सुररुवात केली असून, डाळी व कडधान्यांची मागणी वाढली आहे.एपीएमसीत नियंत्रण कक्षमुंबई बाजार समितीमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी पाचही मार्केटमधील आवकचा प्रत्येक दोन तासांनी आढावा घेतला जात आहे. दोन तासांनी कोणत्या मार्केटमध्ये किती आवक झाली याची माहिती घेऊन ती शासनाला पुरविली जात आहे. पनवेल बाजार समितीला शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा फटका बसला आहे. भाज्यांची आवक देखील कमी झाली आहे. शनिवारी ही आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे.- भरत पाटील, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल.