मुंबईमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा; बाजारभाव वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 05:45 AM2019-03-15T05:45:28+5:302019-03-15T05:45:43+5:30
गुजरातसह देशभरातून आवक सुरू
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ दिवसांपासून भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. राज्यात पीक कमी असल्यामुळे गुजरातसह इतर राज्यातून भाजीपाला मागविला जात आहे.
राज्यात दुष्काळाची स्थिती असून त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. तापमान वाढू लागल्यामुळे शेतीसाठी पुरेसे पाणी मिळेनासे झाले आहे. यामुळे मार्चच्या सुरवातीपासूनच आवक घसरली आहे. पुणे, नाशिक, सातारा व इतर ठिकाणावरून कमी आवक होत आहे. मागणी व पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाली असून व्यापाऱ्यांनी गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान व इतर ठिकाणावरून भाजीपाला मागविण्यास सुरवात केली आहे. प्रत्येक वस्तूच्या किमती २० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. किरकोळ मार्केटमध्येही दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उत्पादनच कमी असल्यामुळे इतर राज्यांवरून येणाऱ्या मालावर अवलंबून राहावे लागत असून आवक पूर्ववत होईपर्यंत भाव वाढतच राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.